For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत सापडले पैसे

11:22 AM Dec 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत सापडले पैसे
Advertisement

रोख रक्कम असलेली कार निवडणूक विभाग व पोलिसांनी पकडली

Advertisement

आमदार निलेश राणेंनी केली ठोस कारवाईची मागणी

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या सांगते दरम्यान खळबळ उडवून देणारी घटना घडली. निवडणूक विभागाचे पथक व पोलिसांनी मालवण पिंपळपार येथे तपासणी दरम्यान एका कारमध्ये सुमारे दीड लाख रोख रक्कम व काही पाकिटे सापडून आली. पुढील तपासासाठी ही कार मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, देवगड येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची ही कार असून ते त्यावेळी गाडीत उपस्थित होते. त्यांची चौकशी सुरु होती. या दरम्यान, मालवण येथील दोन भाजपा पदाधिकारी त्याठिकाणी उपस्थित झाले. पोलिसांशी चर्चा करून कार सोडून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. याचवेळी त्याठिकाणी उपस्थित झालेल्या शिंदे शिवसेना पदाधिकारी यांनी याबाबतची माहिती आमदार निलेश राणे यांना दिली. आमदार निलेश राणे स्वतः गाडी घेऊन मालवण पोलीस ठाण्यात पोहोचले. त्याचवेळी मालवण येथील भाजपा पदाधिकारी निघून जात होते. ही माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांना कळताच ते पुढे धावले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना केल्या. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. कायदा हातात कोणीही घेऊ नये असे निलेश राणे यांनी सांगितले. दरम्यान, आमदार निलेश राणे म्हणाले काय चालले पहा. नंबर प्लेट नसलेली गाडी आहे. हे दाखवताच पोलिसांनी मालवण येथील त्या दोन भाजपा पदाधिकारी यांची कार थांबवली. कारला नंबर प्लेट नव्हती. ती कार पोलीस ठाण्यात आणत निवडणूक विभागाचे पथक, पोलिसांनी कारचा पंचनामा केला. संपूर्ण कारची पाहणी करण्यात आली. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणी ठोस कारवाई होतं नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. आमदार निलेश राणे यांनी त्या ठिकाणी ठाण मांडले. तर ज्या गाडीत पैसे सापडले त्या गाडीतील भाजपा पदाधिकारी व मालवण येथील भाजपा पदाधिकारी यांना पोलीसांनी पोलीस ठाण्यात थांबवून ठेवले होते.दोन तासानंतर डिवायएसपी पोलीस ठाण्यात आले. कारवाई होणार असे त्यांनी सांगितले. मात्र तात्काळ कारवाई झाली पाहिजे या भूमिकेवर आमदार निलेश राणे ठाम राहिले . महेश नारकर देवगड भाजपा तालुकाध्यक्ष, बाबा परब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, अजिंक्य पाताडे आणि एक असे हे चार जण भाजपा पदाधिकारी असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले.अखेर पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका आमदार निलेश राणे यांनी घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पैसा आणि सत्ता या जोरावर कोण दडपशाही करत असेल तर शिवसेना म्हणून जागेवरच थांबवले जाईल. शिवसेना आडवी येणारच समाजात अशा चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना भीती असलीच पाहिजे अशी असल्याचे आमदार निलेश राणे म्हणाले.

Advertisement
Tags :

.