पतधोरण बैठकीचा आज अहवाल होणार सादर
आरबीयाअ गव्हर्नर संजय मल्होत्रा पत्रकार परिषदेतून मांडणार बैठकीचा अहवाल
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय रिझर्व्ह ब्ँाक (आरबीआय) ची चलनविषयक धोरण समितीची बैठक आज 5 डिसेंबर रोजी संपणार आहे. आरबीआय रेपो दरात कपात करणार का रेपोदर जैसे थे राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. रेपो दराचा थेट परिणाम बँक कर्जांच्या व्याजदरांवर होतो. अशा परिस्थितीत, जर रेपो दरात कपात झाली तर त्याचा थेट परिणाम कर्जांच्या व्याजदरांवर होईल, जेणेकरून लोकांना ईएमआयपासून दिलासा मिळणार आहे.
आरबीआय चलनविषयक बैठक 3 डिसेंबर रोजी सुरू झाली. आज तिसऱ्या दिवशी 5 डिसेंबर रोजी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे बैठकीत रेपोदरासंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत. निर्णयाबाबत विविध तज्ञांच्या मतांमध्ये भिन्नता असल्याचे दिसून आले आहे. काही जणांच्या मते रेपो दर स्थिर राखला जाईल तर काहींच्या मते रेपो दर पाव टक्का कमी केला जाईल. आता बैठकीत याबाबतीत कोणता निर्णय घेतला जातो, हे पहावे लागेल.
रेपोदर स्थिर राहणार अभ्यासकांचा अंदाज
एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजचे सीईओ अजय गर्ग यांच्या मते, जीएसटी दर कमी झाल्यामुळे, अन्नधान्याच्या किमतीत घट आणि महागाईत सातत्यपूर्ण घट झाल्यामुळे 2026 च्या सुरुवातीला दर कपात अपेक्षित आहे. तथापि, डिसेंबरमध्ये दर 5.5 टक्क्यांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. एसबीआयच्या अहवालानुसार, या डिसेंबरमध्ये रेपो रेट 5.50 टक्क्यांवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत जीडीपीची मजबूत वाढ आणि सध्याच्या आर्थिक वातावरणामुळे रेपो रेट स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.