कोमामध्ये आहेत मोजतबा खामेनेई
इराणच्या कोम शहरात सुरू आहेत उपचार
इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनेइं गंभीर जखमी असल्याचा दावा एका गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. मोजतबा यांच्यावर सध्या कोम शहरात उपचार सुरू आहेत. खामेनेई हे कोमाच्या अवस्थेत असून त्यांची स्थिती गंभीर असल्याचा दावा करण्यात येत आहे. याचमुळे मोजतबा कुठल्याही निर्णय प्रक्रियेत भाग घेण्यास असमर्थ असल्याचे मानले जातेय.
हा कूटनीतिक मेमो अमेरिका आणि इस्रायली गुप्तचर यंत्रणांकडून आखाती सहकाऱ्यांना पुरविण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर असल्याचे ‘द टाइम्स यूके’च्या अहवालात म्हटले गेले अहे. या अहवालात पहिल्यांदाच सर्वोच्च नेत्याच्या ठावठिकाण्याचा खुलासा झाला आहे. मोजतबा यांच्यावर कोम शहरात उपचार सुरु असल्याने ते शासनाच्या कुठल्याही निर्णयात सामील होत नसल्याचेत यात नमूद आहे. मोजतबा यांचा ठावठिकाणा आता उघड करण्यात आल्याने इस्रायल आणि अमेरिकेकडू त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक अनुपस्थितीमुळे बळावला संशय
पश्चिम आशियात संघर्ष पेटल्यापासून मोजतबा खामेनेई यांनी कधीच सार्वजनिक उपस्थिती नोंदविलेली नाही. त्यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या संदेशांचे प्रसारण इराणच्या सरकारी माध्यमांकडून केले जात आहे. याचमुळे मोजतबा हे गंभीर जखमी असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
अमेरिकेच्या अहवालांमध्ये वेगवेगळे दावे
देशाची धुरा नव्या सर्वोच्च नेत्याच्या हाती असल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी वक्तव्य जारी करत म्हटले आहे. तरीही अमेरिकेच्या अहवालांमध्ये खामेनेई यांच्या प्रकृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मोजतबा कोमामध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. तर द सनच्या एका अहवालात हवाई हल्ल्यांमध्ये खामेनेई यांनी एक हात अन् पाय गमावला असल्याचे म्हटले गेले आहे.
देश चालविण्यास असमर्थ
मोजतबा यांची प्रकृती अत्यंत नाजुक असलयाचे अमेरिका-इस्रायलने स्वत:च्या आखाती सहकारी देशांना कळविले आहे. मोजतबा यांच्यावर कोम येथे गंभीर अवस्थेत उपचार सुरू असून ते शासनात कुठलाही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामील होण्यास असमर्थ असल्याचे गुप्तचर मेमोद्वारे कळविण्यात आले आहे. कोम या शहराला देशाची धार्मिक राजधानी मानण्यात येते आणि अली खामेनेई यांचे पार्थिवही तेथेच असून ते दफन करण्याची तयारी सुरू असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे.
मोठा मकबरा निर्मितीची तयारी
कोम शहरात ‘एक मोठा मकबरा निर्माण’ करण्याचे काम सुरु असून त्यात ‘एकाहून अधिक थडग्यांसाठी जागा असेल’ असे गुप्तचर मेमोत नमूद आहे. यामुळे परिवाराच्या सदस्यांना दिवंगत सर्वोच्च नेत्यासोबत दफन केले जाऊ शकते असे संकेत मिळत आहेत. अली खामेनेई यांच्यावरील अंत्यसंस्कार यापूर्वी टाळण्यात आले होते.