महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बहिष्काराची भाषा करणारे मोईज्जू बनले भारत समर्थक

06:22 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय हवाई दलाच्या विमानाने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोईज्जू यांनी भारताचा दौरा केला. पाच दिवसांच्या दौऱ्यात मोईज्जू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मालदीवच्या भूमिवरून भारतविरोधी हालचाली खपवून घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. भारतावर बहिष्कार घालण्याची घोषणा करून सत्तेवर आलेल्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना वर्षभरातच आपल्या शेजाऱ्यांची चांगलीच ओळख पटल्याचे दिसून येते.

Advertisement

मालदीवमधून भारताची प्रत्येक निशाणी मिटवून टाकण्याची घोषणा करत गेल्यावर्षी झालेली निवडणूक दणाणून सोडली. मदत करण्याच्या नावाखाली भारतीय सैन्याच्या तुकड्या मालदीववर नजर ठेवत असल्याचा दावा करून सहाय्यतेच्या नावाने असलेली सर्व प्रकारची एक एक यंत्रणा परत पाठविण्याचा निर्धार करत मोहम्मद मुईज्जू यांनी तेथील निवडणुकीत रंग भरला. मालदीवसाठी भारतापेक्षाही अधिक चांगले व प्रभावी मित्र असल्याचे जनतेला पटवून दिले. त्याचा परिणाम म्हणून मोईज्जू हे मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत भारत विरोधी अनेक निर्णय घेतले.

Advertisement

भारतविरोधी मोईज्जू यांनी राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर गेल्या कित्येक वर्षांपासून चालत असलेला शिरस्ता बाजूला सारत आपला पहिला विदेश दौरा भारतभेटीतून न करता थेट चीनला भेट देऊन सुरु केला. त्यानंतर मालदीवमध्ये असलेल्या 800 भारतीय नौदल सैनिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. तसेच भारत सरकारच्या अनेक प्रकल्पांचा पुनर्विचार करून कार्यान्वित असलेल्या कामांना स्थगिती दिली. आपत्कालीन स्थितीत भारताकडून पिण्याचे पाणी न मागवता चीन व पाकिस्तानकडून ते मिळविण्याचा प्रयत्न केला असता तो अंगलट आला. भारत सरकारने आपल्या सैनिकांना माघारी बोलावल्यानंतर हवाई अॅम्बुलन्स म्हणून काम करणारी दोन डॉर्नियर विमाने उडविण्याची कला मालदीवच्या सैनिकांना अवगत नसल्याने काही नागरिकांचे प्राण गेल्यानंतर मोईज्जू यांचे डोके ठिकाणावर आले.

भारत सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये सादर केलेल्या आपल्या अर्थसंकल्पात मालदीवला देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यात 48 टक्क्यांची कपात करत गेल्यावर्षीच्या तुलनेत 770 कोटी रुपयांच्या बदल्यात या वर्षी केवळ 400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. भारत सरकारकडून नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, मालदीव, मॉरिशस, सिचीलीस आदी शेजारी देशांना आपल्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात श्रीलंकेला 300 टक्के अधिक अर्थसाहाय्याची तरतूद केलेली असून मालदीवच्या अर्थसाहाय्यात कपात केल्याचे दिसून आले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली असता त्यांनी तेथील समुद्रात स्कुबा डाईव्ह अर्थात डुबकी घेतल्याने जगभरात एक वेगळाच संदेश गेला. लक्षद्वीप बेट पर्यटनासाठी एक पर्याय असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर भारतीयांबरोबरच व अन्य देशांतील पर्यटकांची पावले लक्षद्वीपच्या दिशेने वळू लागली. त्याचा फटका थेट मालदीवला बसला. दरवर्षीच्या तुलनेत भारतीय पर्यटकांची संख्या 35 टक्क्यांनी घटली. 50 हजार भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरविली. परिणामी 150 दशलक्ष डॉलर्सचा फटका मालदीवच्या तिजोरीला बसला.

एका बाजूने पर्यटकांची संख्या घटल्याने विदेशी महसूल बुडाला. विदेशी गंजाजळी 440 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. शिल्लक राहिलेल्या विदेशी गंगाजळीच्या आधारे केवळ सहा महिने मालदीवची अर्थव्यवस्था चालविणे शक्य होते. या देशाची अर्थव्यवस्था चीनी कर्जामुळे डबघाईला आलेली असल्याने चीनपुढे मदतीचा हात पसरविणे शक्य नव्हते. तसेच मालदीवने इस्लामिक बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा 25 दशलक्ष डॉलर्सचा हप्ता पुढील महिन्यात भरणे गरजेचे आहे.

इस्लामिक बँकेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही इस्लामिक देशाने या बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कधी कुचराई केलेली नाही. यंदाच्या वर्षी मालदीवकडून इस्लामिक बँकेचा 25 दशलक्ष डॉलर्सचा हप्ता थकण्याची चिन्ह दिसू लागल्याने राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी भारत शरण्म गच्छामीचे धोरण स्वीकारण्याचे धाडस केले.

भारतावर बहिष्कार घालण्याची भाषा करणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोईज्जू यांनी 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान भारत दौरा केला. पाच दिवसांच्या या दौऱ्यात भारत सरकारने मालदीवला 400 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. तसेच भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वृद्धी करण्याचेही आश्वासन देण्यात आले. एकूणच या दौऱ्यात त्यांना भारत सरकारने संतुष्ट करून पाठविले असून मोईज्जू यांचा उर्वरित कार्यकाळ आता भारत समर्थक म्हणूनच राहणार असे गृहित धरल्यास वावगे होणार नाही.

- प्रशांत कामत

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article