मोहन बागान संघाला अजिंक्यपद
वृत्तसंस्था/ कोलकाता
2024-25 च्या इंडियन सुपर लीग शिल्ड फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद कोलकाताच्या बलाढ्या मोहन बागान संघाने जिंकले. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मोहन बागानने एफसी गोवा संघाचा 2-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
2024-25 च्या फुटबॉल हंगामातील मोहन बागानचा हा 17 वा विजय आहे. या सामन्यात गोवा संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. सामन्याच्या पहिल्या 10 मिनिटांमध्ये गोवा संघाच्या आघाडी फळीने अनेक वेळेला बागानच्या गोलपोस्टपर्यंत मजल मारली पण त्यांना आपले खाते उघडता आले नाही. या सामन्याला सुमारे 65 हजार शौकिन उपस्थित होते. सामन्याच्या उत्तरार्धात बागानच्या आघाडी फळीने गोवा संघाच्या बचावफळीवर चांगले दडपण आणले. त्यामुळे गोवा संघातील खेळाडूंना योग्य ताळमेळ राखता आला नाही. 62 व्या मिनिटाला दिपेंदू विश्वासने बागानला आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना कमिंग्जने दिलेल्या पासवर गोव्याच्या स्टिव्हर्टने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू मारल्याने बागानला हा दुसरा गोल मिळाला.