सकल मराठा समाजाचा मोहोळ येथे रास्ता रोको; वधू- वरासह वऱ्हाडी मंडळी सहभागी
मोहोळ- पंढरपूर- आळंदी पालखी महामार्ग वधू- वरासह वऱ्हाड्यांनी धरला रोखून
पाटकुल प्रतिनिधी
मोहोळ -पंढरपूर -आळंदी पालखी महामार्गावर रास्ता रोको करताना वधू -वरानी रस्त्यावर उतरून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मोहोळ - पंढरपूर - आळंदी पालखी महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईमध्ये सगेसोयरे यांचा आरक्षणामध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विशेष अधिवेशनामध्ये सगेसोयऱ्याचा विषय न घेता मागणी नसणारे आरक्षण देऊ केलेले आहे.त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे. त्याच्या निषेधार्थ आज मोहोळ - पंढरपूर - आळंदी पालखी महामार्गावरती भव्य रास्ता रोको करण्यात आला.
मोहोळ शहरातील पंढरपूर रोड लागत असलेल्या कार्यालयाच्या बाहेरच वधू-वरासह पाहुण्या मंडळींचा रास्ता रोको आंदोलन मोठा सहभाग होता .रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर लग्न मंडपात जाऊन वधू-वरांनी लग्नगाठ बांधली .वाशी येथे झालेल्या आंदोलनात राज्य शासनाने जो अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाप्रमाने आरक्षण देण्याची मागणी वधु वराच्या वतीने करण्यात आली.
मोहोळ -पंढरपूर - आळंदी पालखी महामार्गावर रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांग लागली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आले.या पुढील काळात मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याप्रमाणे सकल मराठा समाजाची दिशा ठरवली जाईल. मनोज जरांगे यांनी येणाऱ्या काळात जर सांगितले की मराठा समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह रस्त्यावर आणून ठेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला .या रास्ता रोको मध्ये सकल मराठा समाजाचे सर्व बांधव तसेच लग्नासाठी आलेले सर्व वऱ्हाडी उपस्थित होते.