मोहन मोरे, झारा, एचएमडी स्पोर्ट्स विजयी
महांतेश कवटगीमठ चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित महांतेश कवटगीमठ चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून झारा संघाने मराठा स्पोर्ट्स ग्रामीणचा, मोहन मोरे संघाने रामराज्य खडक गल्लीचा, एचएमडी संघाने डेपो मास्टर्सचा तर मोहन मोरे संघाने झारा संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. वैभव, इर्षाद, दर्शन, संग्राम यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीणने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 86 धावा केल्या. तानाजीने 4 षटकार, 1 चौकारासह 14 चेंडूत 36, प्रवीणने 1 षटकार, 2 चौकारांसह 16 धावा केल्या. झारातर्फे दर्शनने 13 धावात 2, विनोदने 19 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झारा संघाने 6.2 षटकात 3 गडी बाद 90 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. मयूरने 2 षटकार, 4 चौकारांसह 18 चेंडूत 34, आर्फिदने 2 षटकार, 1 चौकारांसह 9 चेंडूत 18 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे जोतिबा व तानाजी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात मोहन मोरे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 2 गडी बाद 113 धावा केल्या. संग्रामने 6 उत्तुंग षटकार व 4 चौकारांसह 25 चेंडूत 62 तर रवीने 2 षटकार, 3 चौकारांसह 27 धावा केल्या. रामराज्यतर्फे ओमकारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रामराज्य खडक गल्ली संघाने 8 षटकात 6 गडी बाद 67 धावा केल्या. अमोलने 1 षटकार, 5 चौकारांसह 21 चेंडूत 36 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे सन्नीने 26 धावात 3 तर रोहितने 10 धावात 2 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात एचएमडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 90 धावा केल्या. इर्षादने 7 षटकार, 3 चौकारांसह 17 चेंडूत 58 तर सिद्दूने 12 धावा केल्या. डेपो मास्टर्सतर्फे राहुलने 8 धावात 2 तर आकाशने 14 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळतान डेपो मास्टर्सने 8 षटकात 8 गडी बाद 89 धावा केल्या. त्याना हा सामना केवळ 1 धावेने गमवावा लागला. हरीषने 4 षटकार, 3 चौकारांसह 24 चेंडूत 55, तर राजेशने 14 धावा केल्या. एचएमडीतर्फे आर्झनने 5 धावात 3, मुस्ताकने 14 धावात 2 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात झारा इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात सर्वगडी बाद 70 धावा केल्या. जंग शिवाने 1 षटकार, 3 चौकारांसह 19 तर सद्दामने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे सन्नीने 24 धावात 3 तर अक्षयने 3 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 3 षटकात 2 गडी बाद 71 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. वैभवने 5 षटकार, 2 चौकारांसह 9 चेंडूत 46 तर संग्रामने 2 षटकार, 1 चौकारांसह 6 चेंडूत 21 धावा केल्या. झारातर्फे कमल आणि विनोद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
शुक्रवारचे सामने
- वेव वॉरियर्स वि. अव्वाल स्पोर्ट्स स. 8.30 वा.
- श्री शिवाजी तरुण मंडळ वि. ए. के. स्टार स.10.30 वा.
- साईराज वॉरियर्स वि. डिंग डाँग दु. 12.30 वा.
- दुसऱ्या सामन्यातील विजेता व. हनुमान स्पोर्ट्स दु. 2.30 वा.