मोहन मोरे संघ अंतिम फेरीत
एसआरएस-पांडुरंग सीसी यांच्यात उपांत्य सामना
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित 10 व्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या शनिवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने के. आर. शेट्टी मंगाई संघाचा पाच गड्यांनी पराभव करून उपांत्यफेरीत तर उपांत्यफेरीच्या सामन्यात मोहन मोरे इलेव्हन संघाने गो गो स्पोर्ट्स संघाचा 52 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एसआरएसचा प्रथमेश चव्हाण तर मोहन मोरे संघाचा मुझमिल खान यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केआर शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 89 धावा केल्या. मयूर के. ने 1 षटकार 6 चौकारांसह 15 चेंडूत नाबाद 36 तर रब्बानी दफेदारने 1 षटकार 4 चौकारांसह 36 धावा केल्या. एसआरएसतर्फे सुशीलने 2 गडी बाद केले. त्यानंतर एसआरएस हिंदुस्थानने 7.5 षटकात 5 गडी बाद 90 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. सुशील बुर्लेने 4 षटकार, 3 चौकारांसह 17 चेंडूत 38, प्रथमेश चव्हाणने 2 षटकार, 1 चौकारांसह 6 चेंडूत नाबाद 17, उझेरने 15 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे किरण तारळेकरने 8 धावात 4 गडी बाद केले.
पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात मोहन मोरे इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 2 गडी बाद 125 धावा केल्या. त्यात मुझमिल खानने 8 उत्तुंग षटकार व 3 चौकारांसह 24 चेंडूत 67, ओमकार डी. ने 3 षटकार, 3 चौकारांसह 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. गो गो तर्फे साहिल व ओमकार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर गो गो स्पोर्टसने 8 षटकात 6 गडी बाद 73 धावा केल्या. त्यात फैजलने 2 षटकारसह नाबाद 14 तर सचिन के.ने 1 षटकार व 1 चौकारांसह 12 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रज्योतने 9 धावात 3 तर सागरने 1 गडी बाद केला.
आजचे सामने
उपांत्य सामना एसआरएस वि. पांडुरंग सीसी सकाळी 9 वाजता
अंतिम सामना मोहन मोरे वि. उपांत्य सामन्यातील विजेता संघ सकाळी 11 वाजता