For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहन मोही मना....

06:29 AM Aug 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोहन मोही मना
Advertisement

मोहाची रूपं अनेक असतात आणि बहुतांश वेळेला ती आपल्याला अत्यंत आनंद देत असतात. एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्याला मोह पडणे याच्यासारखं म्हणाल तर दुसरं सुख नाही. कारण काय आहे मोहात पडणे ह्या प्रक्रियेत ती वस्तू किंवा ती व्यक्ती एकसारखे समोर असावी असं वाटायला लागतं. मोह कोणत्यातरी वैशिष्ट्यामुळे पडलेला असतो.

Advertisement

सखी गं मुरली मोहन मोही मना

गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा

Advertisement

मोह या शब्दापासून काय काय सुरू होतं, या शब्दाचा परिणाम काय असतो, याच्या अर्थच्छटा किती आहेत, आयुष्यात आपल्याला मोह नक्की कशाकशाचा आणि कुणाकुणाचा पडतो, प्रेम आणि मोह या दोन गोष्टीत नक्की फरक काय, असे असंख्य विचार माझ्या डोक्यात चालू होते. आणि त्याच वेळेला ब्दल्tल्ंा चा वारू मुक्त उधळत असतानाच ‘धर्मकन्या’ या सिनेमातलं हे गाणं एकाएकी सुरू झालं. आता ही खूप जुनी गाणी ऐकायची सवय मोडली असं म्हणावं लागेल. एकेकाळी हीच आणि अशी कितीतरी गाणी एखादं व्रत असावं तशी नियमाने ऐकली जायची. घरातल्या मोठ्या व्यक्ती अशी सुंदर जुनी गाणी पुन्हा पुन्हा लावून ऐकत असायच्या. श्रवणभक्ती होण्यासाठी काही कष्ट करावे लागायचे नाहीत. गाणं ऐकण्याचे हक्क मोबाईलमधून मुठीत आले खरे पण ऐकण्याच्या सवयीच गमावल्या की काय असं वाटायला लागलंय. तर विषय होता मोहाचा. हा मोह आणि प्रेम ह्यात नक्की काय फरक असतो हा तर माझ्या आयुष्यात वर्षानुवर्ष तसाच पडून राहिलेला प्रश्न आहे. म्हणजे बघा, एखाद्या विषयी मोह वाटतो म्हणून व्यक्ती त्याच्या प्रेमात पडते, की ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडते तिला भेटावं, तिचा सहवास आपल्याला मिळावा यासंबंधीचे मोह माणसाला परत परत होत राहतात? आणि या मोहाचा शेवट नक्की कुठे जाऊन होतो? ज्याचा मोह होतो त्या व्यक्तीला किंवा वस्तूला मोहक म्हणतात का आणि म्हणूनच सगळ्यांना मोहिनी घालणारा म्हणूनच कृष्णाचे एक नाव मोहन आहे की काय? तसं म्हणावं तर मोहनापेक्षा मोहिनी ही श्रेष्ठ म्हणायला लागेल. हा आता तिचा अवतार सुद्धा विष्णूंनीच घेतला होता. म्हणजे मोहनातूनच मोहिनी जन्माला आली. मग त्याच्या अनेक रूपांपैकी एकाच रूपाचं नाव झालं मोहिनीराज.

आणि गंमत बघा. या मोहाची रूपं अनेक असतात आणि बहुतांश वेळेला ती आपल्याला अत्यंत आनंद देत असतात. एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीचा आपल्याला मोह पडणे याच्यासारखं म्हणाल तर दुसरं सुख नाही. कारण काय आहे मोहात पडणे ह्या प्रक्रियेत ती वस्तू किंवा ती व्यक्ती एकसारखे समोर असावी असं वाटायला लागतं. मोह कोणत्यातरी वैशिष्ट्यामुळे पडलेला असतो. ते वैशिष्ट्या आपल्याला आयुष्यात प्रिय असतं आणि प्रिय असलेली गोष्ट समोर आली की सारखं तिचं चिंतन करणं चालतं. ज्या वेळेला आपण मोहाधीन झालेलो असतो त्या वेळेला हे चिंतनसुद्धा आपल्याला अतिशय आनंद देतं. आपल्या नशिबात असलं आणि त्या वस्तूची किंवा व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाली तर आणखीन मजा! म्हणजे त्या वस्तूकडे, त्या व्यक्तीकडे किती बघू, किती वेळा बघू, स्पर्श करू का, कितीवेळा स्पर्श करू? तिच्या आधी मी होऊ का माझ्या आधीन तिला ठेवू असं माणसाला होऊन जातं. आणि हे सगळं करत असताना आनंदाच्या सहज उर्मी मनातून उसळत असतात मग हा मोह सुंदर आहे की नाही तुम्हीच सांगा. म्हणून तर मोह या विषयावरती किती सुंदर सुंदर गाणी होतात! ‘मोह मोह के धागे’ आठवलं की नाही? बाकी संत मोहाला षड्रिपूंमध्ये मोजत असले तरी मोह त्यांनाही चुकत नाही. फक्त तो ईश्वरप्राप्तीचा असल्यामुळे त्याला चांगल्या गोष्टीचं अधिष्ठान लाभलेलं असतं. ज्याला अध्यात्माची ओढ आहे त्याला भर तरुण वयातसुद्धा कुठलाही वेगळा मोह पडतच नाही. कारण मोहमयी दुनियेतून तो कधीच बाजूला पडलेला असतो. पण मोह हा रिपु तेव्हाच होतो जेंव्हा त्याला स्वार्थ चिकटतो. नाहीतर मोह होणं स्वाभाविक आहे. मातृहस्तेन भोजनंचा मोह देवाला तरी चुकला होता का? चांगल्या देवासारख्या देवानेही मला मी हयात असेपर्यंत आईच्या हातचं भोजन जेवायला मिळावं अशी इच्छा अवतार घेण्यापूर्वी व्यक्त केली होती. म्हणून श्रीकृष्णाची आई त्यांना जन्मभर पुरली होती. एखाद्या आईसाठी हे दु:खच असतं. पण आईच्या या दु:खाचा विचार खुद्द देवालाही आपल्या मोहापायी करवला नाही. इतका स्वार्थ हा मोह येतानाच आपल्या सोबत घेऊन येतो. म्हणूनच त्याला वैरी म्हणत असावेत. मोह या नावाचं झाडही असतं. विशेषत: विदर्भ आणि तेलंगणाची सीमा इथे दाट जंगले आहेत. त्या जंगलामध्ये ही मोहाची झाडे विपुल प्रमाणात आढळतात. आदिवासी त्या मोहाच्या फुलांपासून निरनिराळ्या वस्तू तयार करतात. या मोहाचा उपयोग दारू तयार करण्यासाठीही होतो हे खरं. परंतु त्याची फुलं विलक्षण गोड असतात. त्याच्या नुसत्या फुलांचे लाडू सुद्धा करून ठेवता येतात आणि त्याला बाजारात फार मोठी किंमत असते. या मोहाच्या तेलालाही किंमत असते. साक्षात मोह म्हणजे काय हे जर कोणाला बघायचं असेल तर त्या झाडाकडे बघावं. कारण याचा मोह ना माणसाला आवरत ना प्राण्यांना! या झाडाचं नाव ठेवताना मोह हेच का ठेवलेलं असावं हे त्याच्या फुलाफळांकडे बघितलं की चटकन लक्षात येतं. ज्याचा मोह कुणालाच आवरत नाही ते मोहाचं झाड. मोह नावाच्या षड्रिपूचं हे व्यक्त स्वरूप म्हणूया का? कोणाला श्रीमंतीचा मोह असतो, कुणाला कपड्यांचा, कुणाला सोन्या-चांदीचा असतो, कुणाला अक्षरश: देहाच्या भोगाचासुद्धा मोह पडतो, आणि त्या मोहापायी माणसं सैरावैरा भटकत राहतात. धावत राहतात. मोहातून पुढे लोभ जन्माला येतो. लोभामुळे आपले अपेक्षाभंग ठरलेले असतात आणि अपेक्षाभंग ठरल्यावर क्रोध येतो. असे एका मागे एक सगळेच्या सगळे षड्रिपू आपल्या मागे लागतात. त्याचं मूळ म्हणजे हा मोह! पण म्हणून मोहाला वाईट म्हणणं हे मला तरी पटत नाही. मोह सुंदर असतो एखाद्या वस्तूचा, एखाद्या व्यक्तीचा मोह पडायलासुद्धा आपलं मन तेवढं सौंदर्योपासक असायला लागतं. एखाद्या कोरड्या स्वभावाच्या व्यक्तीला कशाचाच मोह पडत नाही. निर्मोही होणे म्हणजे कसलेच मोह न पडणे असा अर्थ नव्हे. तर सर्व प्रकारच्या मोहांच्या पाठीमागे काय आहे हे समजून घेऊन त्या मोहांना बळी न पडणे म्हणजे निर्मोह! कारण या पृथ्वीतलावर जन्माला आल्यावर एखाद्या व्यक्तीला कोणताच मोह होत नसेल असं म्हणणं हे धादांत खोटेच आहे. परंतु आपल्या मोहाच्या पाठोपाठ अपेक्षाभंग ठरलेला आहे हे जर मोहात पडल्यावर आपल्याला कळत असेल तर माणूस संयमाने वागतो. आपला मोह अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त करतो. मोहाला चांगल्या गोष्टींकडे वळवतो. साक्षात श्रीकृष्णाला सुद्धा जिथे मोहन म्हटलेले आहे किंवा राक्षसांना प्रभावित करण्यासाठी सुद्धा देवाला स्त्राrचंच रूप घ्यावं लागलं आहे. म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा मोह म्हणजे स्त्राrमोह आहे असं म्हणावं लागेल. परंतु तीच स्त्राr आईसुद्धा असते ही त्या मोहाची अत्यंत सुंदर असलेली दुसरी बाजू आहे. त्यामुळे मोह हा चांगला की वाईट हे तो मोह ठरवत नाही आपला दृष्टिकोन ठरवत असतो. बाकी सब मोहमाया है!

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.