For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावरून अमेरिकेत वाद; ममदानींसह संघटनांचा विरोध

12:11 PM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावरून अमेरिकेत वाद  ममदानींसह संघटनांचा विरोध
Advertisement

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील प्रस्तावित कार्यक्रमावरून अमेरिकेत राजकीय आणि सामाजिक वादाला तोंड फुटले आहे. ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले असून, त्यात मोहन भागवत प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्यासह अमेरिकेतील काही हिंदू, आंतरधर्मीय आणि नागरी हक्क संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

Advertisement

‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD Forum) यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयोजकांच्या मते, कार्यक्रमाचा उद्देश हिंदू-अमेरिकन समुदायाला एकत्र आणणे, सांस्कृतिक वारसा आणि विविध समुदायांमधील संवादाला प्रोत्साहन देणे हा आहे. आयोजकांनी या कार्यक्रमासाठी अमेरिकेतील 200हून अधिक हिंदू-अमेरिकन संघटनांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे.

मात्र, कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या संघटनांनी आरएसएसच्या विचारसरणीवर आक्षेप घेतला आहे. ‘हिंदूज फॉर ह्यूमन राइट्स’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क’ यांसह विविध संघटनांनी न्यूयॉर्क सिटी हॉलबाहेर पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाला विरोध केला. काही संघटनांनी आरएसएस हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत नसल्याचा दावा केला आहे.

Advertisement

न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनीही कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताच्या बहुविध आणि धर्मनिरपेक्ष स्वरूपाच्या कल्पनेशी आपण जोडलेले असल्याचे सांगत त्यांनी ‘बहिष्कारी दृष्टिकोनावर आधारित चळवळी’च्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, हा खासगी कार्यक्रम असल्याने तो रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाकडे आहे की नाही, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

मोहन भागवत यांचा अमेरिकेतील दौरा आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या जागतिक संपर्क अभियानाचा भाग आहे. न्यूयॉर्कमधील कार्यक्रमामुळे भारतीय-अमेरिकी समुदायातील मतभेद पुन्हा चर्चेत आले असून, कार्यक्रमाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी भूमिका मांडल्या जात आहेत. दरम्यान, कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने नोंदणी बंद करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

Advertisement

.