निराशेच्या खाईतून झेपावलेला मोहम्मद सिराज !
‘आयपीएल’ म्हणजे गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करणारी भूमी...पण अशा परिस्थितीतही यंदा काही गोलंदाज आपला ठसा उमटवत असून त्यापैकी एक म्हणजे मोहम्मद सिराज...त्याचं हे यश आणखीनच उठावदार...कारण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचा विचारच झाला नव्हता अन् बऱ्याच वर्षांपासून नातं राहिलेल्या ‘आरसीबी’नंही यंदा त्याच्यापासून फारकत घेणं पसंत केलं होतं...तरीही खचून न जाता सिराजनं आपल्या भेदक माऱ्याचं मोल पुरेपूर दाखवून दिलंय...
मोहम्मद सिराज...या भेदक वेगवान गोलंदाजाला यंदाच्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत संधी का नाकारण्यात आली ?...या प्रश्नाचं पटण्याजोगं उत्तर मिळणं जवळपास कठीणच...त्यापूर्वी त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला होता तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरनं (आरसीबी)...मानवी स्वभावानुसार सिराज या दोन जबरदस्त धक्क्यांमुळं निराश झाला...पण त्यातून सावरून तो त्वेषानं ‘फिनिक्स’ पक्षासारखा परतलाय. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सचं (जीटी) प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्याला मिळालीय आणि त्यानं त्याचं सोनं केलंय...खरं तर ‘आयपीएल’ची सुरुवात मनासारखी झाली नव्हती अन् त्याच्या चार षटकांत पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी रतीब ओतला होता तो 54 धावांचा...
परंतु मोहम्मद सिराजला सवय आहे ती अपयशाच्या दरीतून अचानक झेप घेण्याची...अन् घडलं ते तसंच. त्यानं गुजरातच्या पहिल्या चार लढतींत सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावलाय तो तब्बल दोन वेळा. मुंबईविरुद्ध रोहित शर्मा नि रायन रिकल्टन यांना गारद केलं अन् मिळविले 34 धावांत 2 बळी...तिसऱ्या लढतीत जुना संघ ‘आरसीबी’ला तडाखा देताना सिराजनं दर्शन घडविलं ते चार अत्यंत तिखट षटकांचं (आपल्या पहिल्याच चेंडूवर त्यानं जणू रागानं टाकलेला बाउन्सर फिल सॉल्टला हादरवून गेला). 19 धावांत 3 बळी या कामगिरीमुळं रॉयल्स चॅलेंजर्सचं आव्हान चिन्नास्वामी स्टेडियमवर 8 बाद 169 धावांवर आटोपलं नि गुजरातन टायटन्सनी 8 गडी राखून तो सामना सहज खिशात घातला...
विश्लेषकांना वाटलं होतं की, त्यानं ‘आरसीबी’विरुद्ध केलेल्या गोलंदाजीला मागं टाकणं कठीणच...पण हैदराबादच्या त्या खेळाडूनं आपल्या घरच्या मैदानावर 4 षटकांत 17 धावांच्या बदल्यात 4 बळी टिपून सनरायझर्स हैदराबादला अक्षरश: पाणी पाजलं...सामन्यानंतर सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दुसऱ्यांदा स्वीकारताना मोहम्मद सिराजनं म्हटलं, ‘स्वत:च्या घरच्या मैदानावर खेळताना एक वेगळी भावना मनात होती. माझं कुटुंब स्टेडियममध्ये बसलेलं असल्यानं आत्मविश्वास जास्तच वाढला. मी रॉयल चॅलेंजर्सचं सात वर्षं प्रतिनिधीत्व केलं अन् त्यामुळं ते सुद्धा माझं घरच. मी जीवनात अनेक चांगल्या व वाईट अशा दोन्ही क्षणांचं दर्शन घेतलंय’...
‘जेव्हा मला संधी नाकारण्यात आली तेव्हा मी गोलंदाजी, तंदुरुस्ती आणि मानसिकतेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केलं. मी वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा फायदा झालाय तो गोलंदाजीला. खरं म्हणजे वगळण्याचा निर्णय मला सहन झाला नव्हता. पण मी स्वत:ला समजावलं की, अजून क्रिकेट संपलेलं नाही अन् नियंत्रण मिळविण्यासारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. सातत्यानं विश्रांतीशिवाय खेळत असल्यामुळं माझ्या गोलंदाजीत निर्माण झालेले दोष समजले नव्हते (2023 नंतर त्याच्यापेक्षा जास्त चेंडू टाकलेत ते फक्त रवींद्र जडेजानं). आता मात्र पुन्हा एकदा मी उत्साहानं गोलंदाजी टाकतोय’, सिराजचे शब्द...
मोहम्मद सिराजच्या बालपणातील प्रशिक्षकांच्या मते, त्याला फलंदाजांचे कच्चे दुवे व्यवस्थित माहीत असतात आणि तो त्यांचा फायदा घेण्यावर लक्ष केंद्रीत करतो. हैदराबादविरुद्धचा त्याचा स्पेल पाहिला तर, ट्रॅव्हिस हेड नि अभिषेक शर्मा यांना मनमोकळेपणानं फटकेबाजी करण्यास वावच मिळाला नाही. यामुळं ते ‘पॉवरप्ले’मध्ये बाद होऊन त्याचा परिणाम सनरायझर्सवर झाला...चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सिराजला वगळण्यात आलं तेव्हा तो एकदिवसीय सामन्यांमध्ये अव्वल गोलंदाज होता (तरीही वाट्याला आलेल्या नकारामुळं शक्य तितक्या सुधारणा करण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा त्याच्यात निर्माण झाली, असं प्रशिक्षकांनाही वाटतंय...
या प्रशिक्षकांच्या मतानुसार, मोहम्मद सिराज नेहमीच कर्णधार किंवा संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचं पालन करणारा खेळाडू...तथापि, तो पूर्वी फक्त आदेशांचं पालन करायचा. आता गुजरात जायंट्समध्ये सामील झाल्यानंतर त्यानं स्वत: विचार करायला सुऊवात केलीय. कारण त्याला स्वत:च्या बळावर टिकून राहावं लागेल याची जाणीव झालीय...सिराजचा वेगही वाढलाय अन् तो सातत्यानं ताशी 140 किलोमीटरांपेक्षा जास्त वेगानं मारा करतोय !
लाळेची ताकद...
- तोंडातल्या लाळेत चित्र बदलून टाकण्याची ताकद कशी लपलीय ते दाखवून दिलंय मोहम्मद सिराजनं...इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेंडूला लाळ लावण्यावरील बंदीला उठविण्यात आल्यानंतर त्याचा सर्वांत जास्त फायदा मिळालाय तो सिराजलाच. त्याच्या शब्दांत सांगायचं झाल्यास त्यामुळं गोलंदाजाला 100 टक्के लाभ मिळतो...
- जेव्हा लाळेचा वापर बंद करण्यात आला होता तेव्हा त्याचा फायदा मिळाला तो फलंदाजांना. कारण चेंडू बॅटवर सहज यायचा. परंतु चेंडूनं स्विंग वा कट झाल्यास फलंदाजाला पायचित करणं वा त्याचा त्रिफळा उडविणं सोपं जातं...
- क्रिकेटमधील तज्ञांच्या मते, लाळेत घामापेक्षा जास्त चमत्कार घडविण्याची शक्ती असते. शिवाय घामात मिठाचा अंश असल्यानं चेंडूचं वजन वाढू शकतं. याउलट लाळ संतुलन राखण्याचं काम उत्कृष्टरीत्या बजावते...
- चेंडू देखील लाळ लावल्यानंतर उत्तम प्रतिसाद देतो. यामुळं सिराजला गोलंदाजी टाकताना चेंडूवर अधिक मजबूतरीत्या पकड जमविणं सोपं झालंय. समालोचकांच्या चर्चेतील सुरानुसार लाळेमुळं चेंडू रिव्हर्स स्वींग करण्याचा लाभ मिळतो अन् मोहम्मद सिराजनं त्याचं दर्शन अतिशय छान पद्धतीनं घडविलंय. त्याचे आत घुसणारे चेंडू अचानक खतरनाक बनलेत..
- ‘इंडियन प्रीमियर लीग’नं लाळेवर बंदी घातली ती कोव्हिड-19 च्या जमान्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) अजूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेतलेला नसला, तरी ‘आयपीएल’नं मात्र लाळेला पूर्ववत महत्त्वाचं स्थान मिळवून दिलंय...
- एका गोलंदाजी प्रशिक्षकानुसार, सध्याच्या युगातील गोलंदाज वाढलेत ते लाळेचा सातत्यानं वापर करत. जेव्हा त्यावर अचानक बंदी घालण्यात आली तेव्हा प्रत्येकाचं गणित गडबडलं...सिराजच्या बाबतीत या अनुकूल पैलूत भर पडलीय ती त्याच्या अनुभवाची...
‘आयपीएल’मध्ये सिराज...
- मोहम्मद सिराजनं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 17 धावांत 4 फलंदाजांना गारद केलं अन् त्याच्या टी-20 कारकिर्दीतल्या सर्वोत्तम कामगिरीकडे बरोबरी साधली...
- आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांचा विचार केल्यास त्यानं 15.40 धावांच्या सरासरीनं मिळविलेत 10 बळी...
- सिराजनं अजूनपर्यंत इंडियन प्रीमियर लीगमध्ये 103 बळींची नोंद केलीय आणि 100 हून अधिक बळी मिळविणारा तो एकंदरित 26 वा गोलंदाज ठरलाय...
‘आयपीएल’मधील वाटचाल...
- मोहम्मद सिराजला फेब्रुवारी, 2017 मध्ये इंडियन प्रीमियर लीगसाठी सर्वप्रथम करारबद्ध केलं ते 2.6 कोटी ऊपयांना सनरायझर्स हैदराबादनं. त्यावेळी त्याची आधारभूत किंमत होती 20 लाख ऊपये. सनरायझर्ससाठी तो सहा सामने खेळला आणि त्यानं 10 बळी घेतले...
- त्यानंतर जानेवारी, 2018 मध्ये त्याला खेचलं ते रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरनं. तिथं त्यानं सात वर्षं काढली अन् तो ‘आरसीबी’च्या वेगवान माऱ्याचा अविभाज्य भाग बनला...त्या संघातर्फे त्यानं 87 सामन्यांतून 31.44 च्या सरासरीनं 83 फलंदाजांना टिपलं...
- यंदाच्या ‘आयपीएल’साठीच्या महालिलावापूर्वी ‘आरसीबी’नं सोडल्यानंतर त्याला ‘गुजरात टायटन्स’नं करारबद्ध केलं ते 12.25 कोटी रु. मोजून. त्यावेळी त्यानं लिलावात प्रवेश केला होता तो 2 कोटी रुपयांच्या ‘बेस प्राईस’सह...
मोहम्मद सिराजची ‘आयपीएल कारकीर्द...
वर्ष सामने बळी सरासरी सर्वोत्कृष्ट
- 2017 6 10 21.20 4-32
- 2018 11 11 33.36 3-25
- 2019 9 7 38.42 2-38
- 2020 9 11 21.45 3-8
- 2021 15 11 32.09 3-27
- 2022 15 9 57.11 2-30
- 2023 14 19 19.79 4-21
- 2024 14 15 33.07 3-43
- 2025 5 10 15.40 4-17
- एकूण 98 103 28.90 4-17
‘आयपीएल’मध्ये सर्वांत वेगानं 100 बळी घेणारे भारतीय...
गोलंदाज लागलेले सामने
- हर्षल पटेल 81
- भुवनेश्वर कुमार 81
- आशिष नेहरा 83
- संदीप शर्मा 87
- जसप्रीत बुमराह 89
- मोहित शर्मा 92
- मोहम्मद शमी 94
- शार्दुल ठाकूर 97
- मोहम्मद सिराज 97
- झहीर खान 99
- राजू प्रभू