दोनापावला दरोडाप्रकरणी मोहम्मद याकुब अली गजाआड
सहा महिन्यांनंतर पणजी पोलिसांना यश : धेंपो कुटुंबियांच्या बंगल्यावरील दरोडा
पणजी : नागाळी दोनापावला येथील धेंपो कुटुंबियांच्या बंगल्यावर घातलेल्या दरोडा प्रकरणात पणजी पोलिसांनी अखेर काल गुरुवारी मोहम्मद याकुब अली या संशयिताला अटक केली आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 310(2) अंतर्गत गुन्हा नोंद केला असून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या दरोड्याने संपूर्ण गोव्याला हादरवून सोडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव मोहम्मद याकुब अली (46 वर्षे) असे असून तो मूळ मध्यप्रदेश येथील आहे. गेली अनेक वर्षे तो कळंगुट येथे राहत होता. मोहम्मद याकुब अली याचे मुख्य आरोपीशी जवळचे संबंध आहेत. मोहम्मद याने धेंपो यांचा बंगला ओळखण्यात आणि दरोडा घडवून आणण्यात मदत केली होती, असे तपासात उघड झाले आहे. मोहम्मदने दरोडा घालण्यापूर्वी आणि नंतरही संशयितांना आश्रय दिला होता.
कळंगुटचा महम्मद याकुब अली सराईत गुन्हेगार
दोनापावला येथील दरोडाप्रकरणी अटक करण्यात आलेला मोहम्मद याकुब अली हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात वास्को पोलिसस्थानकात यापूर्वी अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याला वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 307, 395, 397, 398, 399, 332 आर/डब्ल्यू 3 आणि 25 शस्त्रास्त्र कायद्याच्या गुह्याखाली अटक केली होती. त्या प्रकरणातील मुख्य संशयितांसह कोलवाळ तुऊंगात त्याने शिक्षा भोगली आहे. दोनापावलाच्या दरोड्यात बंगला दाखविण्याचे काम मोहम्मदने केले होते, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
सहा महिन्यांपूर्वीचा दरोडा
धेंपो कुटुंबियांच्या बंगल्यात दरोडेखोरांनी दरोडा घालून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळून लाखो ऊपयांचा ऐवज लंपास केला होता. बंगल्यात राहत असलेल्या धेंपो कुटुंबातील वयोवृद्ध जोडप्याला रात्रीच्यावेळी अत्यंत भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले होते. तीन सशस्त्र दरोडेखोर बंगल्यात घुसले आणि त्यांनी 77 वर्षीय जयप्रकाश धेंपो आणि त्यांची 71 वर्षीय पत्नी पद्मिनी यांना त्यांच्या पलंगावर बांधले होते. रात्री 12 ते 4 वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता. सुरक्षा रक्षकावर हल्ला करून तिघेही बंगल्यात घुसले होते. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रथम पद्मिनी आणि जयप्रकाश यांना बेडवर बांधले जयप्रकाशने डोळे उघडले तेव्हा त्याना समोर तीन व्यक्ती उभ्या असल्याचे दिसले होते. सकाळी घरकाम करणाऱ्या महिलेने दैनंदिन कामे करण्यासाठी घरात प्रवेश केला तेव्हा ही घटना उघडकीस आली होती. पणजी पोलिसांनी सहा महिन्यांनंतर दरोडा प्रकरणातील संशयिताला अटक केली आहे. यात त्यांनी गुन्हा अन्वेषण पोलिसांचेही सहकार्य घेतले. पणजी पोलिस पुढील तपास करीत असून लवकरच इतर संशयितांना अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.