For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यात होणार सभा

06:05 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यात होणार सभा
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

दक्षिण गोव्यात यंदा प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याने त्यांना जिंकून आणण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दक्षिण गोव्यात कार्यकर्ते व मतदारांत उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच पल्लवी धेंपे यांचा विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी भाजपने दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याची तयारी चालवली आहे. यासाठी जागा निश्चितही करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, पंतप्रधान मोदी यांच्या होकाराची प्रतीक्षा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान मोदी यांची दक्षिण गोव्यात सभा घेण्याचा पक्षाने विचार चालवला आहे. साधारणत: कुडचडे या ठिकाणी ही सभा होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान दक्षिण गोव्यात सभा  होण्याचे संकेत आहेत. दक्षिणेतील जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दक्षिण गोव्यातील जागा काहीही करून जिंकणे हेच भाजपसमोर सध्यातरी आव्हान आहे. त्यामुळे कुडचडे येथे दक्षिणेतील सर्वात मोठी जाहीर सभा होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.

Advertisement

पंतप्रधान मोदी यांना दक्षिण गोव्यात सभा घेण्याविषयी कळविण्यात आले असून, पंतप्रधान मोदी यांचा होकार मिळाल्यानंतर सभेची जय्यत तयारी करण्यात येणार आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपने पूर्ण ताकद वापरली असून, यासाठी मडगावचे आमदार दिगंबर कामत हेही उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यासमवेत मडगाव व सासष्टीतील जनतेशी संवाद साधत आहेत.

 काँग्रेसकडूनही जोरदार प्रचार

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी काँग्रेसनेही जोरदार प्रचार सुरू केला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा हे स्वत: उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासमवेत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. सासष्टी तालुक्यात काँग्रेसला नेहमीच मतदारांचा आशीर्वाद लाभलेला आहे. शिवाय दक्षिणेतील मुरगाव तालुकाही काँग्रेसचा बालेकिल्ला राहिल्याने या दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून अधिक अपेक्षा आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.