राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना मोदींच्या दिवाळी शुभेच्छा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडियावर यासंबंधीचे छायाचित्र जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात आपली भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीला पोहोचले होते. मोदींनी दिवाळीनिमित्त उपराष्ट्रपतींनाही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यापूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत राष्ट्रपती मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी भारतातील आणि जगभरातील सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते’, असे ट्विट राष्ट्रपतींनी केले आहे.