मोदीजींचे विचार विकसित भारताच्या दृष्टिकोनाला आकार देणारे
‘मन की बात’ ऐकल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा 120 वा भाग पाहिला. त्यानंतर बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या विचारांमधून विकसित भारताच्या दृष्टिकोनाला आकार देणाऱ्या प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण गोष्टी ऐकण्यास मिळाल्या, असे सांगितले. सांखळी मतदारसंघातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम ऐकला. त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांच्या मन की बातमधील काही ठळक मुद्यांचा उल्लेख केला. त्यात प्रामुख्याने ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत कचरामुक्त भारतसाठी सतत प्रयत्न करण्याचे केलेले आवाहन, ‘व्होकल फॉर लोकल’च्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्वदेशी उत्पादने आणि एमएसएमईंना पाठिंबा देण्याचे आवाहन, ‘कृषी आणि शेतकरी’ यांना उत्पादकता वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करण्याचे केलेले आवाहन, ‘डिजिटल इंडिया आणि एआय’च्या माध्यमातून प्रशासन आणि शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर केलेली चर्चा, तसेच ‘महिलांच्या नेतृत्वाखालील विकास’ यावर बोलताना ‘क्रीडा ते उद्योजकता’ या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या यशस्वी महिलांचा केलेला गौरव, यांचा समावेश होता. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मुळे देशवासियांमध्ये एकसंघतेची तसेच देशाच्या प्रगतीत सहभागाची भावना वाढीस लागते, असे ते म्हणाले.