मोदींकडून विमानतळावर कतारच्या अमीरांचे स्वागत
दोन दिवशीय भारत दौऱ्यावर दाखल : द्विपक्षीय बोलणी होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वत: पोहोचले. कतारचे अमीर विमानतळावर दाखल होताच आलिंगन देत मोदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर काही वेळातच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी ‘एक्स’वर भेट व स्वागताचे फोटो अपलोड केले. या फोटोंमध्ये दोघेही नेते आलिंगन देताना आणि सुहास्य वदनाने स्वागत करताना दिसत आहेत. आता त्यांचे मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल.
कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करतील. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी त्यांच्या भेटीची माहिती दिली होती. भारताच्या दौऱ्यावर अमीर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतील.
कतारच्या अमीरांसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारत भेटीवर दाखल झाले आहे. या शिष्टमंडळात ज्येष्ठ मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळांचे प्रतिनिधी आहेत. विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. भारत आणि कतार दोन्ही देशांमध्ये मजबूत संबंध आहेत. भारत आणि कतारमधील संबंध वाढवण्याच्या उद्देशाने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी एका वर्षात चारवेळा कतारला भेट दिली आहे. या काळात त्यांनी अनेक द्विपक्षीय बैठकांमध्ये भाग घेत कतारचे अमीर शेख तमीम हमद अल थानी यांच्या भारत भेटीच्या तयारीला अंतिम स्वरूप दिले. यापूर्वी, गेल्यावर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख अल थानी यांची भेट घेत त्यांना भारत भेटीचे आमंत्रणही दिले होते.
कतारमध्ये मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी राहतात. सद्यस्थितीत कतारमध्ये सुमारे आठ लाख भारतीय नागरिक असून ते वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, वित्त आणि कामगार अशा विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. कतार हा भारताचा सर्वात मोठा एलएनजी पुरवठादार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताचा कतारसोबतचा द्विपक्षीय व्यापार सुमारे 18.77 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिदा अल-काबी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला इंडिया एनर्जी वीकसाठी भारताला भेट दिली. आपल्या भेटीदरम्यान, अल-काबी यांनी भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कतारच्या वचनबद्धतेवर भर दिला होता.