For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदींची सिद्धरामय्यांवर टोलेबाजी

06:56 AM May 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोदींची सिद्धरामय्यांवर टोलेबाजी
Advertisement

मुख्यमंत्रिपदी किती काळ टिकतील शाश्वती नाही : बेंगळुरात अभिनंदन कार्यक्रमात पंतप्रधानांचा हल्लाबोल

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या कर्नाटकात किती काळ टिकतील याची शाश्वती नाही, असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काँग्रेसमधील सत्तावाटपाच्या संघर्षाचा उल्लेख केला. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपच्या विजयाचे सूत्रधार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य भाजपतर्फे बेंगळूरच्या एचएएलच्या विमानतळाजवळ हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आयोजिलेल्या अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते.

जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जनता समस्यांनी त्रस्त असताना केवळ काँग्रेसचे नेतेच सरकारी तिजोरीतून लुटलेल्या पैशांवरून अंतर्गत भांडणे आणि खुर्चीसाठीच्या लढाईत गुंतले आहेत. मुख्यमंत्री कर्नाटकात किती काळ टिकतील हे मला माहीत नाही. यापूर्वी राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत असताना काय झाले होते, हे सर्वांना माहीत आहे. कर्नाटकातही काँग्रेस त्याच मार्गावर पुढे जात आहे. जिथे जिथे काँग्रेस सत्तेवर येते, तिथे तिथे नेहमीच समस्या निर्माण होते. हिमाचल प्रदेशात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार दिले गेलेले नाहीत. तेलंगणामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. केरळ निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या काँग्रेसला अद्याप मुख्यमंत्री निवडता आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

राज्यातून काँग्रेसला हटवा

काँग्रेस पक्ष हा विश्वासघात करणारा पक्ष असल्याने त्याला राज्यातून हटवलेच पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे. राज्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज आहे. पाठीत खंजीर खुपसण्याची कल्पना काँग्रेसच्या रक्तातच आहे. काँग्रेस सत्तेसाठी काहीही करू शकतो, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

काँग्रेसकडून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम

2014 पूर्वी दहा वर्षे काँग्रेस पक्ष डीएमकेच्या पाठिंब्याने केंद्रात सत्तेत होता. मात्र, आपण सत्तेत नाही असे सांगून काँग्रेस पक्षाने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी एका नव्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस त्या पक्षाच्याही पाठीत खंजीर खुपसेल. तो दिवस दूर नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेस पक्षाने केवळ आपल्या मित्रपक्षांच्याच पाठीत खंजीर खुपसला नाही तर देशातील महिलांचाही विश्वासघात केला आहे. काँग्रेसने महिला आरक्षण सुधारणा विधेयक हाणून पाडले आहे. त्यामुळे विश्वासाघात करणाऱ्या काँग्रेसला पराभूत करावे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

केरळमध्येही सरकार स्थापण्याचा दिवस दूर नाही

भाजपची शासनपद्धती अशी आहे की, एकदा सरकार स्थापन केले की जनता आम्हाला दोन ते तीनवेळा संधी देते. आसाम आणि पुद्दुचेरी ही याची उदाहरणे आहेत. दहा वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे तीन आमदार होते. आता आम्ही 203 आमदारांसह सरकार स्थापन केले आहे. आता केरळमध्ये आमचे तीन आमदार आहेत. तिथेही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दिवस फार दूर नाही, असे भाकीत मोदींनी केले.

बेंगळूर भारताच्या भविष्याचे इंजिन

कर्नाटकमध्ये लोकसभेतील सदस्यांच्या संख्येनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, हे कोणीही विसरू नये. बेंगळूर भारताच्या भविष्याचे इंजिन आहे. आज जर संपूर्ण जग डिजिटल इंडियाबद्दल बोलत असेल तर ते बेंगळूरच्या युवाशक्तीमुळे आहे. कर्नाटकच्या आयटी कौशल्यासह संशोधनाने देशाला आत्मनिर्भर बनवले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

13 किलो वजनाचा चांदीचा पुतळा देऊन सन्मानित

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमधील ऐतिहासिक विजयानंतर प्रथमच बेंगळूरला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, व्ही. सोमण्णा, शोभा करंदलाजे, भाजपचे प्रदेश प्रभारी राधा मोहनदास अग्रवाल, विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, खासदार पी. सी. मोहन यांनी स्वागत केले. कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हैसूर पेटा, रेशीम शाल आणि स्मृतिचिन्ह म्हणून मोदींचा 13 किलो वजनाचा चांदीचा पुतळा देऊन सन्मानित करण्यात आले.

पंतप्रधानांच्या वाहतूक मार्गावर आढळल्या जिलेटीन कांड्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करणाऱ्या मार्गावर दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने गंभीर चिंता निर्माण झाली होती. बेंगळूर दक्षिण तालुक्मयातील वडेरहळ्ळी गेटजवळ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या असून पोलीस खात्याकडून  तपास तीव्र केला आहे. तपासासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. याप्रकरणी कोरमंगल येथील 40 वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.