मुख्यमंत्रिपदाबाबत सर्वाधिकार मोदी, शहांना
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण : सरकार बनविताना माझा अडसर असणार नाही,महाविकास आघाडीलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला
ठाणे : सरकार बनविताना माझा कोणताही अडसर असणार नाही. तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली. तुम्ही घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. निर्णय घेताना वाटू देऊ नका की, एकनाथ शिंदेची अडचण आहे, असे स्पष्टीकरण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होणार याबाबत सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आहेत. त्यांच्या निर्णयाला शिवसेनेचे संपूर्ण समर्थन आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सर्व अधिकार देत भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले. त्याचबरोबर सुरु असणाऱ्या अनेक चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी गेल्या अडिच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे लोकांची सेवा करता आली हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, असे सांगितले. अडिच वर्षे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली, त्यांचे आभार काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मानले. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचा कोणताही उमेदवार असेल, त्याला आपला पाठिंबा असेल असे सांगून सध्या तरी मुख्यमंत्रिपदावर दावा सोडल्याचे स्पष्ट केले. तसेच उद्या दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर बैठक होईल, त्यावेळी अंतिम निर्णय होईल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेंडू थेट भाजपच्या वरिष्ठ पातळीच्या कोर्टात टाकला आहे. म्हणजेच, त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात मुख्यमंत्रिपदावरून गेल्या दोन दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. शिंदे सेनेचे शिलेदार आणि भाजपचे मंडळी यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून एकवाक्यता दिसली नाही. दोन्ही गट त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी कसरत करताना दिसले. त्यांचे नाव रेटताना दिसले. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाने भाजपला अगोदरच पाठिंबा जाहीर केल्याने राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदावरून तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच आज एकनाथ शिंदे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाबाबत आपले मत व्यक्त केले.
आम्ही काढले स्पीडब्रेकर : महाविकास आघाडीला टोला
‘जीवन में असली उडान बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा असमान बाकी है’, या शायरीतून मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढचे चित्र स्पष्ट केले. अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. इतर देशांसोबतचे भारताचे नाते विकसीत झाले आहे. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी राहू नये, हे सांगण्यासाठी आज बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीडब्रेकर नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. मी नाराज वगैरे मुळीच नाही, मी रडणारा माणूस नाही तर लढणारा माणूस आहे. आम्ही सगळेच लढणारे आहोत, लढून काम करणारे लोक आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आणि उद्धव ठाकरेंना टोला लगवाला. एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केलं ते मनापासून केले.
आज महायुतीची बैठक
महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे. महायुतीला मजबुतीने उभं करायचं आहे. उद्या आमची बैठक आहे. तिन्ही पक्षाची दिल्लीत बैठक होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख उपस्थित असणार आहेत. तिथे चर्चा होईल. त्यात निर्णय होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार मजबूत आणि अभेद्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका राज्याच्या चौदा कोटी जनतेसाठी एक मोठी भूमिका असून आम्ही त्याचे स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पेंद्रीय नेतफत्त्व जो निर्णय करेल तो सर्वांनाच मान्य असेल, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. आमची लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणसाठी आहे, असेही ते म्हणाले. नागपूर येथे पत्रकार परिषेत ते बोलत होते. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचे काम केले, असे सांगून ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राला अधिक बळकटी मिळाली आहे. महायुतीच्या अभूतपूर्व विजयात तिन्ही नेते आणि सर्व घटक पक्षांची मेहनत असून त्यामुळे मोठा जनादेश मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी कणखर मुख्यमंत्री म्हणून मागील अडीच वर्षे काम केले असून समाजाच्या प्रत्येक घटकाला व महाराष्ट्राच्या विकासाला न्याय दिला.
युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनांना बंद करण्याचे काम महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बंद पडलेल्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदे यांचं काम बघतोय, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी एक मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खंदा लाऊन समफद्धी महामार्गासारखा मोठा महामार्ग पूर्ण केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला. हे शिंदे यांना पटले नाही आणि त्यासाठी हिंदुत्वाची भूमिका घेऊन, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुढे घेऊन महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी मोठी भूमिका घेतली होती. आतापर्यंतच्या इतिहासात इतके बहुमत मिळाले नव्हते. तेवढे संख्याबळ आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मिळवले आहे.मोदीजींच्या नेतफत्वात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी बहुमत मिळवले आणि महायुती भक्कम करण्याचे काम केले.मराठा आरक्षण, सामाजिक समता, ओबीसी आरक्षण, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, रखडलेल्या प्रकल्पांना गती दिल्याचे बावनकुळे म्हणाले.