For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनमोहन सिंग यांची मोदींनी केली प्रशंसा; निवृत्त होणाऱ्या सदस्यांसाठी निरोप समारंभ

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनमोहन सिंग यांची मोदींनी केली प्रशंसा  निवृत्त होणाऱ्या सदस्यांसाठी निरोप समारंभ
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

राज्यसभेतील अनेक सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असलेल्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांसाठी गुरुवारी राज्यसभेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पंतप्रधान मोदीही राज्यसभेत पोहोचले. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणावेळी निवृत्त होणाऱ्या राज्यसभा सदस्यांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मागील अधिवेशनाच्या वेळी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी सत्ताधारी पक्ष जिंकणार हे निश्चित होते, तरीही डॉ. मनमोहन सिंग व्हीलचेअरवर बसून सभागृहात आले आणि त्यांनी मतदान केले होते. स्वत:वरील जबाबदाऱ्यांबाबत सतर्कतेचे हे उदाहरण आहे. ते कोणाला मत द्यायला आले होते हा प्रश्न नाही. मात्र, ते लोकशाही बळकट करण्यासाठी आले होते, असे मला वाटते. मनमोहन सिंग यांनी सहावेळा खासदार पद भूषविले असून 2004-2014 दरम्यान ते देशाचे 13 वे पंतप्रधान होते. तसेच पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेत उदारीकरणाचा काळ सुरू झाला, अशा अनेक आठवणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या.

पंतप्रधानांनी राज्यसभेतून निवृत्त झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या अनुभवातून नवीन पिढी काहीतरी शिकेल अशी आशा व्यक्त केली. राज्यसभेचे 68 सदस्य त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून फेब्रुवारी ते मे दरम्यान निवृत्त होतील. यावषी राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत असलेल्यांमध्ये अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदींची नावे आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळही याच वषी संपत आहे. जे. पी. नड्डा हे आपले गृहराज्य हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत. राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यसभेतील 50 सदस्य 2 एप्रिल रोजी तर सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थान यांचा समावेश आहे.

Advertisement

राज्यसभेतील निरोपपर भाषणात ‘चिमटे-टोमणे’

खर्गे-देवेगौडा यांच्यात शाब्दिक कलगीतुरा : पंतप्रधान मोदींकडून जुन्या आठवणींना उजाळा

देवेगौडा म्हणाले...

मी भाजपला पाठिंबा देण्यामागे एकमेव कारण आहे. आयुष्यात वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. काही काँग्रेसवाल्यांना पक्ष उद्ध्वस्त करायचा असताना मला माझा पक्ष वाचवायचा आहे.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून एकमेकांवर ‘हल्ले’ वाढले आहेत. राज्यसभेतील निवृत्त सदस्यांच्या निरोपपर समारंभात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी गुऊवारी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवर निशाणा साधताना पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना कोंडीत पकडले. ‘तुम्ही देशाचे पंतप्रधान होणे काँग्रेस पक्ष सहन करेल का?’ असा प्रश्न उपस्थित केला. तर, तर खर्गे यांनी आपल्या भाषणात देवेगौडा यांचे नाव घेत ते कोणाची स्तुती करत नसताना पंतप्रधान मोदींची स्तुती कशी करतात, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचे म्हणणे ऐकून पंतप्रधान मोदींना हसू आवरता आले नाही. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आपल्या भाषणात माजी पंतप्रधान देवेगौडा यांना कोपरखळ्या मारल्या. ‘मी 25 वर्षांहून अधिक काळ देवेगौडा यांच्यासोबत काम केले आहे. ते कोणाची स्तुती करत नाहीत. पण आता अचानक त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती करायला सुऊवात केली आहे,’ असा  टोमणा खर्गे यांनी मारला. देवेगौडा राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय मार्ग बदलल्याच्या खर्गे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. भाजपला काँग्रेसमधील काही लोकांपासून वाचवण्यासाठी आपण वेगळा पवित्र घेतल्याची कबुली त्यांनी दिली.

मनमोहन सिंग रडल्याचा दावा

काँग्रेस नेतृत्वाच्या चुकांमुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एकदा रडले होते. ज्या व्यक्तीने 10 वर्षे देशावर राज्य केले, ज्याने देशाला कर्जाच्या खाईतून वाचवले आणि ज्याने संपूर्ण प्रामाणिकपणे देशाची सेवा केली त्यांना लोकसभेत टू-जी स्पेक्ट्रमची चर्चा सुरू असताना रडावे लागल्याचा दावा देवेगौडा यांनी केला. तसेच खर्गे यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना दिलेला पाठिंबा याची कबुली दिली. परंतु, 2019 मध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार पडल्याबद्दल त्यांनी काही काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरले. जेडीएसचे नेतृत्व एच. डी. कुमारस्वामी करत होते.

Advertisement
Tags :

.