महादशेच्या चक्रव्यूहात मोदी सरकार
नरेंद्र मोदी सरकार आणि भाजप एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना पंतप्रधानांना महादशेने पीडलेले आहे अशी वृत्ते आहेत. ती किती बरोबर अथवा चूक ते काळच दाखवेल. पण 25 वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यानंतर आणि 2014च्या मे महिन्यात दिल्लीची सत्ता सांभाळल्यानंतर प्रथमच त्यांना आक्रमक विरोधकांचा सामना करावा लागत आहे हे निश्चित.
कोण ज्योतिषावर किती विश्वास ठेवतो हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. नेतेमंडळी वरकरणी तरी त्याच्यापासून आपण अतिशय दूर आहोत असे दाखवतात पण प्रत्यक्षात गुपचूपपणे आपला हात अथवा पत्रिका दाखवायला मागेपुढे पाहत नाहीत. कोणी बघितले नाही की झाले. त्यांचा धंदाच एवढा बेभरवशाचा. त्यामुळे ‘उद्या’ आपल्याविषयी काय घडणार याबाबत त्यांना चिंता असणे साहजिकच आहे. समाजसेवेकरता कोणी राजकारणात नसतो. भासवतात सगळेच एकजात.
नरेंद्र मोदी सरकार आणि भाजप एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात असताना पंतप्रधानांना महादशेने पीडलेले आहे अशी वृत्ते आहेत. ती किती बरोबर अथवा चूक ते काळच दाखवेल. पण 25 वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यानंतर आणि 2014च्या मे महिन्यात दिल्लीची सत्ता सांभाळल्यानंतर प्रथमच त्यांना आक्रमक विरोधकांचा सामना करावा लागत आहे हे निश्चित. मोदींच्या भात्यातील सर्व बाण संपले आहेत असा याचा अर्थ नव्हे. पण त्यांची स्थिती ही रणांगणावर बावरलेल्या योद्ध्यासारखी झालेली आहे. कोणत्याही संकटावर लीलया मात करतील अशी मोदींची छबी धुसर झालेली आहे. ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’ ही घोषणा त्यांचे कट्टर भक्तदेखील विसरलेले दिसत आहेत.
अशावेळी कुख्यात जेफ्री एप्सटिन बरोबर वादग्रस्त केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा फोटो अमेरिकेने प्रसिद्ध करून येथील राजकीय क्षेत्रात वादळ माजवले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबरोबर पुरी यांच्या राजीनाम्याची मोहीम आता परत सुरु होऊ शकते. पुरी यांना राज्यसभेची नवीन टर्म मिळालेली नसल्याने त्यांचे मंत्रीपद अगोदरच धोक्यात आलेले आहे. भाजपला राम राम ठोकूनदेखील मोदी-शहा यांचे गोडवे गाणाऱ्या तामिळनाडूच्या अण्णामलाई या नेत्याला आता भाजपचा वीट आलेला दिसत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दास आणि अभिजीत रांका यांना ज्या प्रमाणे आठवडाभर तुरुंगात डांबण्याचे काम करण्यात आले आणि जंतर मंतरला विरोध प्रदर्शनाकरता बंद करण्यात आले, त्याने अण्णामलाई चिडलेले आहेत. 14-15 वर्षांपूर्वी अण्णा आंदोलनाच्या वेळी जेव्हा धरपकड झाली होती त्याचा निषेध करणारे मोदी सत्तेत आल्यावर त्याप्रमाणेच वागत आहेत अशी कडवट टीका करून भाजपला त्यांनी घरचा आहेर दिला आहे. ‘आपली सत्ता टिकवण्यासाठी मोदी यांना नेहमी नवे शत्रू शोधावे लागतात आणि परदेशातून आपल्याला पदभ्रष्ट करण्याचे कारस्थान होते असे आरोप करावे लागत आहेत’, असे सांगून अण्णामलाई यांनी पंतप्रधानांची सूत्रे सूटत चालली आहेत असेच सूतोवाच केलेले आहे.
अशावेळीच पंतप्रधानांनी विरोधी पक्ष आणि विशेषत: राहुल गांधी यांच्यावर कडवट हल्ला करून स्वत:ची कोंडी झालेली आहे असेच दाखवले आहे. वोट चोरीच्या मुद्यावर राहुल यांनी सुरु केलेले आंदोलन सरकारला जड जात आहे असाच त्याचा अर्थ होय. विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या ‘रेजिम चेंज’ (सत्ताबदल) बाबत केलेल्या वक्त्यव्यांनी सत्ताधारी उगीचच कासावीस झालेले दिसत आहेत. कोणत्याही लोकशाहीत विरोधकांचे काम हे सरकारला विरोध करण्याचे, त्याचे वाभाडे काढण्याचे आणि वेळप्रसंगी त्याला उलथवण्याचे आहे हे सर्वविदित आहे. अशावेळेला अशा वक्तव्यांचे भांडवल करून भाजपकडून काय साधले जाते हे अनाकलनीय आहे.
अरुणाचल प्रदेशात चीनबरोबरील सरहद्दीवर वारंवार दोन्ही देशांची सुरक्षा दले ठिकठिकाणी भिडत आहेत हा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस संघटनेचे प्रमुख शत्रूंजय कपूर यांचा गौप्य्स्फोट सरकारला अडचणीत आणणारा आहे. एकीकडे चीन भारताच्या एव्हढ्या कागाळ्या काढत असताना मोदी सरकारने बोटचेपे धोरण का बरे ठेवलेले आहे? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे देखील अलीकडे बदलवून अगोदरच एक वाद माजवलेला आहे. स्वत:ला ‘विश्वगुरू’ म्हणून भासवणाऱ्या मोदींचा गेल्या आठवड्यात अमेरिकेने केलेला पाणउतारा जगाने बघितला नाही असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उजवे हात समजले जाणारे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी जामनगरला भेट देऊन मुकेश अंबानी यांचा जो उदोउदो केला त्याने सत्ताधाऱ्यांना खचितच मिरच्या झोंबल्या असणार. मोदींना बाजूला ठेवून रुबियो यांची झालेली ही भारत भेट भाजपला एक धक्काच होय. अंबानी आणि अमेरिकेचे हे वाढते गुळपीठ सत्ताधाऱ्यांना चकित करून गेले हे नक्की. पूर्णत: व्यवहारीपणे वागणारी अमेरिका भारताबरोबर व्यापार करार करून आवळा देऊन कोहळा काढण्याच्या प्रयत्नात आहे अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. गेली वर्षभर या करारासंबंधी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. 5वर्षात भारताने 500 बिलियन डॉलरच् माल आयात केला पाहिजे असे दडपण वॉशिंग्टन आणत आहे. एकीकडे सीमेवर चीनच्या वाढत्या हालचाली तर दुसरीकडे व्यापार कराराबाबत अमेरिकेची दादागिरी या कात्रीत भारत सापडलाय. 4-5 महिन्यांवर आलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणूकीनंतर केंद्रात मोठे फेरबदल संभवतात असे बोलले जात आहे. योगी आदित्यनाथ आणि अमित शहा यांच्यात पुढील पंतप्रधान होण्याची स्पर्धा वाढेल आणि मोदींना पुढील राष्ट्रपती बनवण्याचा डाव खेळला जाईल असे बोलले जाते. तात्पर्य काय मोदी यांची पंतप्रधानपदाची सद्दी संपत आली आहे असे सांगितले जात आहे. अशावेळीच ‘तकदीर पे भरोसा हैं, तो एक डाँव लगा ले’ च्या धर्तीवर पंतप्रधान एक नवी खेळी खेळायच्या तयारीला लागले आहेत अशी चर्चा आहे.
सुनील गाताडे
