मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण,भाजपतर्फे ‘संकल्प से सिद्धी’
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात ‘संकल्प से सिद्धी’ हा कार्यक्रम काल सोमवारी घेण्यात आला. ‘संकल्प से सिद्धी’ कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम, गोवा भाजपचे अध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर तसेच उपस्थितांमध्ये सभापती रमेश तवडकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, प्रेमेंद्र शेट, राजेश फळदेसाई, दिव्या राणे, ऊदाल्फ फर्नांडिस व कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारने देशाचा आणि राज्याचा मोठा विकास केला. पंतप्रधान मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’च्या महत्त्वाकांक्षी स्वप्नाला साकार करण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. देशाबरोबरच गोव्यातही विविध कार्यक्रमांविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंतकुमार गौतम यांनी केंद्र सरकारच्या भविष्यातील योजना व कार्यक्रमांची माहिती देत गोव्यात विविध कार्यक्रम आयोजित करावेत, असे सांगितले.