मोदींचे ‘रेड कार्पेट’वर भव्य स्वागत
पंतप्रधान मोदी सात वर्षांनी चीनमध्ये दाखल : एससीओ शिखर परिषदेत सहभागी होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली , बीजिंग
जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला पोहोचले. ते तब्बल सात वर्षांनी चीनला पोहोचले आहेत. एससीओ शिखर परिषदेव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही करतील. यादरम्यान, राष्ट्रपती पुतीन यांच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमावरही चर्चा होण्याची संभावना आहे.
संपूर्ण जग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांशी झुंजत असताना पंतप्रधान मोदींचा चीन दौरा होत आहे. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आणि चीनवर 30 टक्के टॅरिफ लादला आहे. या करांबाबत अधिकारी पातळीवरील बोलणी सुरू असतानाच मोदी चीनमध्ये पोहोचले आहेत. चीनमध्ये 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान एससीओ शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत 20 हून अधिक देशांचे नेते सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तियानजीन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होतील. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोदी काय बोलतात याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. याशिवाय, ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा देखील करणार असल्याने भारतीयांना त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
मोदींसाठी रेड कार्पेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बीजिंग भेटीबद्दल चीन अत्यंत उत्साहित दिसून आला. चीनने पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ रेड कार्पेट अंथरले होते. तियानजीनमध्ये आगमन झाल्यावर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. चीनमध्ये दाखल होताच पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर ‘मी चीनमधील तियानजीनला पोहोचलो आहे. एससीओ शिखर परिषदेत चर्चा आणि विविध जागतिक नेत्यांना भेटण्याची उत्सुकता आहे.’ असे ट्विट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळजवळ 7 वर्षांनी चीनला पोहोचले आहेत. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिक आणि भारतीय सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. तसेच अमेरिकेने रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी भारतावर 50 टक्के कर लादल्यानंतरचा हा पहिलाच प्रसंग आहे. याठिकाणी आता चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र निदर्शनास येणार आहेत.
गेल्या महिन्यात जयशंकर यांची चीनला भेट
गेल्या महिन्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला भेट दिली होती. त्यांनी अध्यक्ष शी जिनपिंग आणि परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. जयशंकर यांनी जलसंपदा डेटाची देवाण-घेवाण, व्यापार निर्बंध, एलएसीवरील तणाव कमी करणे, दहशतवाद्यांविरुद्ध कठोर भूमिका घेणे यासारख्या मुद्यांवर चर्चा केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत मोदींच्या चीन दौऱ्याचा रोडमॅप तयार झाला होता. या रोडमॅपला आता मोदींच्या उपस्थितीत अंतिम स्वरुप मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.