For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी-योगी यांचे चिमुकल्यांसोबत रक्षाबंधन

06:30 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोदी योगी यांचे चिमुकल्यांसोबत रक्षाबंधन
Advertisement

जेन-अल्फा’समवेत लुटला आनंद : राहुल गांधींनी प्रियांकासोबतचा फोटो केला शेअर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रक्षाबंधनाच्या सणाने शुक्रवारी देशभर उत्सवाचे वातावरण निर्माण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलांसोबत म्हणजेच ‘जेन-अल्फा’समवेत हा सण साजरा करत त्यांच्याकडून राखी बांधून घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपली बहीण प्रियांका गांधी-वद्रासोबतचा एक फोटो शेअर केला. एकंदरीत, या सणाने राजकारणाच्या सीमा ओलांडत बंधुप्रेम व स्नेहाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला. प्रमुख नेत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत, प्रत्येकाने आपापल्या अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करताना एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement

रक्षाबंधनाचा सण दरवर्षी भाऊ-बहिणीच्या नात्याला समर्पित असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधताना भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. यावर्षी देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशेष प्रसंगी चिमुकल्यांची भेट घेतली. मुलांनी त्यांना राखी बांधली आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण शेअर केले. पंतप्रधानांचे मुलांशी असलेले नाते नेहमीप्रमाणेच यावेळीही लोकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाल्यानंतर त्यांना कोट्यावधी ‘लाईक्स’ मिळाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मुलांसोबत रक्षाबंधन साजरे केले. त्यांनी मुलांकडून राखी बांधून घेत त्यांच्यासोबत वेळ घालवला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीनेही लोकांची मने जिंकली, कारण सणासुदीच्या काळात ज्येष्ठ नेते सामान्य लोकांशी आणि मुलांशी जोडले गेलेले पाहून लोकांना नेहमीच आनंद होतो.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा सण खास पद्धतीने साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावर आपली बहीण प्रियांका गांधी-वद्रासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी देशातील सर्व बहिणी आणि भावांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या पोस्टलाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.