‘मोदी अन् भारत आमचे शत्रू’
पाकिस्तानात महिलांसाठी दहशतवादाचा अभ्यासक्रम
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानात दहशतवादी गट आता महिलांना आत्मघाती हल्लेखोर म्हणून तयार करत असून त्यांच्या नव्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात उघडपणे मोदी आणि भारत हे प्रमुख शत्रू असल्याची घोषणा केली जात आहे. लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटना ‘महिला सशक्तीकरण’ नावाने आयोजित व्यासपीठाद्वारे महिलांची भरती करत असून त्यांना स्वत:च्या कट्टरवादी विचारसरणीने प्रभावित करत आहेत. लीक झालेल्या व्हिडिओत एलईटीचा ‘नवा अभ्यासक्रम’ दाखविण्यात आला असून यात भारत आणि पंतप्रधान मोदींना मुख्य शत्रू संबोधिण्यात आले.
दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर
सियालकोटमध्ये दहशतवादी हाफिज अब्दुल रौफच्या नेतृत्वात महिलांचे ब्रेनवॉशिंग केले जात आहे. एलईटीचा प्रमुख कमांडर रौफ आता महिलांना दहशतवादी करण्यासाठी लाइव्ह ऑनलाइन सत्र आयोजित करत असून याला ‘दहशतवादाचा नवा अभ्यासक्रम’ ठरविले जात आहे. पाकिस्तान-भारत युद्ध आमच्यासाठी धर्मयुद्ध आहे. मरकज-ए-तोयबा आमचे केंद्र होते, आमचा सर्वात मोठा शत्रू मोदी, भारत आहे. आम्हा सर्वांना जिहाद करावाच लागेल असे दहशतवादी इम्तियाज अहमद मक्की या महिलांना सांगत असल्याचे व्हिडिओत दिसून येते.