मोदी एके मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असेल आणि तो महाराष्ट्रातील असेल का, यावरील चर्चेला देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर पूर्णविराम मिळायला हरकत नसावी. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे वेगवेगळ्या चर्चांना तोंड फोडण्यामध्ये वाक्बगार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या रेशीमबागेतील भेटीनंतर त्यांनी अशाच प्रकारे धागेदोरे जुळवून त्यात सर्वांना गुरफटून टाकण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा गुंता अतिशय हळूवारपणे सोडवून फडणवीस यांनी आपला चाणाक्षपणा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भाजपाशी जुळवून घेण्याकडे कल वाढल्याचे दिसून येते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढती दरी व शिंदे गट तसेच भाजपातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेकडून मोठ्या प्रमाणात साखरपेरणी केली जात आहे. मोदी यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातील असेल, ही राऊत यांची भविष्यवाणी हा त्याचाच भाग. देवेंद्र फडणवीस हेच भविष्यातील पंतप्रधान असू शकतात, हेच राऊत यांना यातून सुचवायचे असावे. त्यातून फडणवीस यांच्याजवळ जाण्याचे त्यांचे प्रयत्न दिसतात. असे असले, तरी नेमके वास्तव काय, याचे राऊत यांनाही भान असावे. भाजपकडून पक्षातील नेत्यांसाठी 75 वर्षे ही अलिखित डेडलाईन ठरविण्यात आली आहे. त्यानुसार अनेक नेत्यांना 75 वर्षांनंतर निवृत्त केल्याचीही उदाहरणे सापडतात. हे बघता मोदी हेदेखील सप्टेंबरमध्ये निवृत्त होण्यासाठी नागपूर दौऱ्यावर आल्याच्या चर्चा पसरविण्यात आल्या. परंतु, त्यामध्ये काही तथ्य असायचे कारण नाही. पंच्याहत्तरीपर्यंतचा निकष भाजपाने ठेवला, हे नक्की. मात्र, मोदी यांची एकूणच कामाची पद्धत, त्यांची तंदुऊस्ती, अनेक तास काम करण्याची क्षमता व मुख्य म्हणजे सध्या तरी त्यांच्या नेतृत्वाला कोणताही पर्याय नसणे, या बाबी आगामी काळातही मोदी यांच्याकडेच देशाचे नेतृत्व राहील, याला बळकटी देतात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर 2029 नंतरही मोदी हेच देशाचे पंतप्रधान राहतील, असे स्पष्ट सांगूनच टाकले, यातच सर्व आले. देशाच्या राजकारणावर जवळपास सहा दशके काँग्रेसचा प्रभाव राहिला. भाजप व अन्य पक्षांची सरकारे आली. परंतु, कुठल्याही पक्षाचा या काळात देशावर एकछत्री अंमल राहिला नाही. मात्र, 2014 मध्ये मोदी लाटेने सर्व समीकरणे उलटीपालटी केली. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता प्राप्त केली आणि तेव्हापासून भाजपाची देशभर घोडदौड सुरूच असल्याचे दिसते. आज जवळपास अर्धा अधिक भारत भाजपाने पादाक्रांत केला आहे. 2019 नंतर 2024 च्या निवडणुकीतही यश मिळवत मोदी यांनी हॅट्ट्रिक नोंदवली असून, नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. या माध्यमातून देशातील प्रभावशाली पंतप्रधानांच्या यादीत मोदींनी स्थान मिळविल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे या दहा ते बारा वर्षांच्या काळात मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. ही लोकप्रियता मोदी यांना अशी तशी मिळालेली नाही. त्यामागे निश्चितच त्यांची मेहनत आहे, हे नाकारता येत नाही. जनतेशी असलेला थेट संवाद, हे मोदी यांचे सर्वांत मोठे बलस्थान म्हणता येईल. मागच्या दोन टर्ममध्ये मोदी यांनी विविध योजना आणल्या. त्यातल्या किती यशस्वी झाल्या किंवा क्रांतिकारक ठरल्या, हे एक वेळ बाजूला ठेऊया. परंतु, या योजना ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या, त्याला तोड नसावी. मोदी यांची हीच खासियत ठरते. छोट्या छोट्या प्रकल्पाच्या किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ते ज्या प्रकारे लोकांशी कनेक्ट होतात, त्यातून एक वेगळीच वातावरणनिर्मिती होते. एकप्रकारे या साऱ्याला लोकचळवळीचे वा लोकसहभागाचे ऊप येते आणि तेच मोदी यांचे यश होय. विरोधक काहीही म्हणोत किंवा मीडियामध्ये काहीही छापून येवो. पण, आजही बहुतांश लोक मोदी यांच्या वाणीवर विश्वास ठेवतात. म्हणूनच ‘मोदी है तो मुमकीन है,’ याकडे आपण केवळ डायलाग म्हणून दुर्लक्ष करू शकत नाही. 2014 पासून आजपर्यंत मोदी यांच्या कार्यकाळात बरेच निर्णय झाले. यातील काही धोरणांचा जनसामान्यांना फटकाही बसला. नोटबंदीसारख्या निर्णयांमुळे अर्थकारणावरही परिणाम झाला, हे खरेच. पण, अनेक चांगल्या गोष्टीही झाल्या. भ्रष्टाचार, पारदर्शकतेच्या पातळीवर पावले पडली. गुंडगिरीला लगाम घालण्याचे प्रयत्न झाले, अशी लोकभावना आहे. या साऱ्या बाबी मोदी यांना गुडबुकमध्ये नेतात. तशी मोदींनंतर कोण, याची चर्चा अधूनमधून सुरू असते. पर्याय म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी यांची नावे घेतली जातात. अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचे नावही भावी पंतप्रधान म्हणून घेतले जात आहे. किंबहुना, आज तरी मोदी यांना कोणताही पर्याय दिसत नाही. तसा भाजप हा धोरणी पक्ष आहे. त्यात रा. स्व. संघ हे तर भाजपचे मूळ. हे बघता मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा विचार संघ वा भाजपाच्या डोक्यात आत्तापासून सुरू असू शकतो, असे म्हणावयास जागा आहे. अर्थात जोवर मोदी यांचा जनमानसावर प्रभाव आहे. तोवर त्यांना कुणी हलवू शकत नाही, हीदेखील वस्तुस्थिती होय. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयी चर्चा करणे वायफळ ठरेल. हेच वातावरण कायम राहिले, तर मोदी आणखी एक टर्म घेतील व त्यानंतरच्या काळात स्वत:च आपला पर्याय जाहीर करू शकतील. एकूणच मोदी यांच्या धक्कातंत्री राजकारणाची शैली बघता भविष्यात ते स्वत:च नेतृत्वावरून पायउतार होण्याची शक्यता जास्त. तूर्तास मोदी एके मोदी, हेच खरे.