बेळगाव पोलीस दलातील बिनतारी संदेश यंत्रणेचे आधुनिकीकरण
बेळगाव : बेळगाव पोलीस दलातील बिनतारी संदेश यंत्रणेचे डिजिटलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी अधिकारी व पोलिसांना सहजपणे कोणत्याही अडथळ्यांशिवाय एकमेकांशी संभाषण करता येणार आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी अॅनालॉग व्यवस्था अस्तित्वात होती. आता तिचे डिजिटलीकरण करण्यात आले आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात पाच टॉवर उभारण्यात आले आहेत. बेळगाव शहरासाठी 35 स्टॅटिक, 180 मोबाईल सेट, 8 रिपिटर व 563 वॉकीटॉकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सर्व उपकरणांच्या साहाय्याने बिनतारी संदेश यंत्रणेच्या डिजिटलीकरणाचे काम पूर्ण झाले असून यासाठी अधिकारी व पोलिसांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यापूर्वी पोलीस दलातील संदेशाची देवाणघेवाण बिनतारी यंत्रणेवरच अवलंबून होती. मोबाईलचा जमाना सुरू झाल्यानंतर या यंत्रणेवरील अवलंब कमी झाला. तरीही अॅनालॉग बिनतारी यंत्रणा कार्यरत होती. काळानुरुप तंत्रज्ञानात बदल झाला. आधुनिक यंत्रणा अस्तित्वात आली. आता पोलीस दलाने ही यंत्रणा आत्मसात केली आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस दलाकडे जुन्या मॉडेलच्या वॉकीटॉकी होत्या. आता 2025 मॉडेलची बिनतारी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. वॉकीटॉकीमध्ये जीपीएस यंत्रणा असून तिची बॅटरी आणि आवाजाचा दर्जाही उच्च आहे. त्यामुळे नवी व्यवस्था पोलीस दलासाठी अनुकूल ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.