वैद्यकीय सेवेतील आधुनिकता आरोग्यासाठी वरदान
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
गेल्या काही वर्षांतील वैद्यकीय सेवांमध्ये विकसित झालेली आधुनिकता, प्रगती आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. उपचारातील विकसित AI तंत्रज्ञान, त्याच्या जोडीला तज्ञ डॉक्टरांचे संशोधन यांच्या समन्वयाने आजाराचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यात क्रांतीकारी बदल घडले आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्याच्या डिजीटल वैद्यकीय क्षेत्रात भारताच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ( Press Information Bureau ) दिलेल्या आकडेवारीनुसार माता व नवजात शिशुंच्या मृत्यू दरात (श्श्R) लक्षणीय घट झाली असल्याचे नमुद केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) मुळे कर्करोगांसह अनेक जटील आजारांचे निदान सहज शक्य झाले आहे. रोबोटिक सर्जरी, टेलेमेडिसिनमुळे शस्त्रकिया सुलभ व जलद झाल्या आहेत. स्मार्टवॉच, फिटनेस वॉकरचा हृदयरोग, मधुमेह, रक्तदाबाच्या रूग्णांसाठी प्रभावी लाभ होत आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक बदलांचा तज्ञ डॉक्टरांकडून घेतलेला आढावा....
प्रत्येकजण उत्तम आरोग्यासाठी धावतो आहे. आपले शरीर सदृढ रहावे, यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. वैद्यकीय क्षेत्रानेही प्रत्येक टप्प्यावर प्रगती केल्याने माणसाच्या उपचारातील अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी प्रगतीचे पाऊल उचलले आहे. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहून वैद्यकीय सुविधांचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जागतिक पातळीवर भारतानेही वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने आधुनिकतेचा प्रभाव टाकला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत डिजिटल हेल्थ मिशनने प्रत्येक नागरिकाला डिजिटल हेल्थ आयडी प्रदान केला आहे. यामुळे रुग्णांचा वैद्यकीय इतिहास एका क्लिकवर उपलब्ध होतो. कोरोना काळात स्वदेशी संशोधनातून बनवलेली कोव्हॅक्सिन व इतर लसींनी भारताची वैद्यकीय क्षमता जगासमोर सिद्ध केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर भरारी घेणारा देश बनला आहे.
- जागतिक आरोग्य दिनाविषयी
दुसऱ्या महायुद्धा नंतर सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्र व WHO या संस्था गठीत केल्या. मानवी आरोग्याच्या सुधारणेसाठी,आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आरोग्य सेवांच्या विकासासाठी WHO ही संघटना झटत आहेत. याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली, त्यामुळे हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
- निरोगी सुरवात, आशादायक भविष्य
WHO ने यंदा ‘Healthy Beginning, Hopeful futures ’ म्हणजेच ‘निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य’ असे घोषवाक्य देऊन माता व नवजात शिशु यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या महत्त्वाच्या समस्यांवर जागरूकता करणे, राष्ट्रीय धोरण बनविण्यास मदत करणे,आंतरराष्ट्रीय समन्वय घडवून आणणे, संसाधनांचा या कामाकरिता केंद्रित वापर करणे व राष्ट्रांना कृती करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने घोषवाक्य केले जाते.
- माता व नवजात शिशू मृत्यू दरात घट
देशाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) नुसार, माता मृत्यू दरात (MMR) लक्षणीय घट झाली आहे, 2000 मध्ये 384 असलेला माता मृत्यू दर 2020 मध्ये 103 पर्यंत खाली आला आहे. नमुना नोंदणी प्रणाली (एRए) 2020 नुसार, नवजात मृत्यू दर ( SRS ) 2014 मध्ये प्रति 1000 जिवंत जन्मांमध्ये 26 होता, तो 2020 मध्ये 20 पर्यंत कमी झाला आहे. देशाने मोठ्या प्रमाणात यावर उपाय शोधून मृत्यू दरात घट मिळविण्यात यश मिळवले आहे. तरीही माता व नवजात शिशूंच्या शाश्वत (एअ)विकासाची ध्येये गाठण्यात देशाला अद्यापही यश आलेले नाही.
- वैद्यकीय तंत्रज्ञानातील आधुनिक बदल :
कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) आणि मशीन लर्निंग: आज AI च्या विस्तारामुळे अनेक जटिल आजारांचे अचूक निदान केले जात आहे. देश-परदेशातून, आहे त्या ठिकाणावरून डॉक्टरांना उपचार करणे सोपे झाले आहे. उदाहरणार्थ, कर्करोगासारख्या आजारांचे प्राथमिक टप्प्यातील निदान AI वर आधारित अल्गोरिदमद्वारे शक्य झाले आहे. रेडिओलॉजीमध्ये, AI स्कॅनमधून सूक्ष्म बदल ओळखून डॉक्टरांना उपचारासाठी मदत होत आहे.
टेलिमेडिसिन : ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी टेलिमेडिसिन हे एक क्रांतीकारक पाऊल ठरले आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून रुग्ण आता घरी बसून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. 2025 पर्यंत, या सेवेचा विस्तार आणखी वाढला असून, व्हर्च्युअल रिअॅलिटी ( VR) च्या सहाय्याने रुग्णांचे परीक्षणही शक्य झाले आहे.
रोबोटिक सर्जरी : गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हे तंत्रज्ञान अचूकता, कमी रक्तस्त्राव व रूग्ण जलद रिकव्हर होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. हृदय शस्त्रक्रियसह आणि रूग्णांना अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारात याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग भरारी आहे, असे तज्ञांकडून सांगितले जाते.
जेनेटिक थेरपी आणि पर्सनलाइज्ड मेडिसिन: जीन एडिटिंग तंत्रज्ञान, जसे की ण्Rघ्एझ्R, आता दुर्मिळ जनुकीय आजारांवर उपचारासाठी वापरले जात आहे. रुग्णाच्या डीएनएवर आधारित वैयक्तिक औषधे तयार करणे हे आता स्वप्न राहिलेले नसल्याचे या विभागातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
वेअरेबल डिव्हायसेस: स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्स आता फक्त व्यायाम मोजण्यापुरते मर्यादित नाहीत. ते हृदय गती, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी आणि अगदी झोपेच्या गुणवत्तेचे विश्लेषणही या उपकरणंच्या माध्यमातून होत आहे. या उपकरणांमुळे हृदरोग, रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना आजराशी निगडित प्रत्यक हालचालींवर स्वत:हून काळजी घेता येते, असे हृदयरोग तज्ञ सांगतात.
- आधुनिक उपचारातील आव्हाने आणि भविष्य :
वैद्यकीय क्षेत्रातील झालेल्या प्रगतीसोबत विविध आव्हानेही आता समोर येत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे रूग्णांचा डेटा सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा खर्च व प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता यावर मात करणे गरजेचे आहे. भविष्यात, क्वांटम कम्प्युटिंग आणि नॅनो टेक्नॉलॉजी यासारख्या नव्या क्षेत्रांचा वैद्यकीय सेवांमध्ये अधिक समावेश होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली.
- आयुष्याची सुरूवातच निरोगी असावी
मुलांच्या आरोग्यावर भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य अवलंबून आहे. तरुणांच्या तंदुरूस्तीसाठी बाल वयातच आरोग्य सांभळणे गरजचे आहे. तरूणपणात आरोग्याच्या समस्या उद्भवण्यापेक्षा बालपणीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून निरोगी आयुष्याची सुरुवात करणे प्रभावी ठरेल. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञ मोलाची भूमिका बजावत आहे.
डॉ. सुदेश गंधम, प्राध्यापक व विभाग प्रमुख, जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय