For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर निपाणीत पाऊस

09:57 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर निपाणीत पाऊस
Advertisement

निपाणीसह परिसराची पावसाची प्रतीक्षा संपली : खरिपाच्या उगवणीसाठी पूरक पाऊस : दुबार पेरणीचे संकट दूर

Advertisement

वार्ताहर /निपाणी

अवकाळीनंतर वळीव आणि त्या पाठोपाठ मान्सून पाऊस बरसल्याने निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निकालात निघालीच पण त्याचबरोबर शेती पिकांना देखील जीवदान प्राप्त झाले. खरीप पेरणीची कामे देखील आटोपण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. परिसरात जवळपास 70 टक्क्याहून अधिक पेरणीची कामे पूर्णत्वाला आली आहेत. अशा या परिस्थितीत गेल्या तीन दिवसात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. शनिवार पाठोपाठ रविवारी तर अगदी उन्हाळ्याप्रमाणे उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे पेरणी केलेली वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक शेतकरी पेरणीची कामे थांबवून पावसाच्या प्रतीक्षेत थांबले होते. पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील शेतकरी वर्ग अडचणीत आला असतानाच रविवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह पाऊस परिसरात बरसला. या पावसामुळे उगवण योग्य वातावरण मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.

Advertisement

गतवर्षी निपाणीसह परिसरात पावसाने जेमतेम हजेरी लावली. याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. शेती पिकांचे उत्पादनही जेमतेमच झाले. अनेक शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भेडसावू लागल्याने ऊस उत्पादनाकडे पाठ फिरवावी लागली. यामुळे यंदा परिसरात खरीप पेरणीसाठी क्षेत्र वाढले आहे. अधिकतर शेतकरी सोयाबीन उत्पादन घेण्याला प्राधान्यक्रम देत आहेत. शासनाच्या वतीने कृषी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध करण्यात आले पण ते बियाणे अल्पावधीतच संपले. सोयाबीन बियाणाची वाढलेली मागणी लक्षात घेता यंदा खरीप उत्पादन क्षेत्र वाढणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

जसजसा पाऊस झाला त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली. गेल्या दहा ते बारा दिवसात परिसरातील 70 टक्के पेरणीची कामे आटोपली आहेत. शिवारात उगवण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी आगाऊ पेरणीची चांगली उगवण झाली आहे. यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असल्याने शेतकरी वर्गामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला असल्याचे दिसत होते. पण आता गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पूर्णत: पाठ फिरवल्याने शिवारात पेरणी केलेली वाया जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. मोर, पारवाळ, वानरांचा उपद्रव वाढताना पेरणी केलेले बियाणे खाल्ले जाण्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

अनेक शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवारात रखवालदाराप्रमाणे रखवाली करू लागले आहेत. पण तरी देखील पिकांना धोका वाढतच होता. पावसाने पाठ फिरवल्याने आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने उगवण झालेल्या पिकांना देखील धोका निर्माण झाला. उगवण झालेले कोंब सुकू लागले होते. एकीकडे पक्ष्यांचा उगवण न झालेल्या बियाणांना उपद्रव वाढला होता तर दुसरीकडे उगवण झालेले कोंब उन्हामुळे कोमेजू लागले होते. यामुळे खरीप पेरणीला दुहेरी संकट निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी महागातले बियाणे वापरले आणि आता पावसाविना पेरणी वाया जाण्याची भीती निर्माण होताना आर्थिक संकट पुढे दिसत होते.अशावेळी काही शेतकरी पाणी देण्याची तयारी करत होते पण सर्वच शेतकऱ्यांना ते शक्य नसल्याने पावसाची प्रतीक्षा वाढली होती. असे असताना रविवारी दुपारी मान्सूनपूर्व पाऊस विश्रांतीनंतर पुन्हा बरसला. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.