दक्षिण-उत्तर विभागांतून होणार मॉडेल वॉर्डची निवड
मनपाच्या पर्यावरण विभागाकडून चाचपणी सुरू : प्रभाग निश्चितीनंतर नगरविकास खात्याला
बेळगाव : महापालिकेकडून दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांतील प्रत्येकी एका प्रभागाची मॉडेल वॉर्ड म्हणून निवड केली जाणार आहे. सदर मॉडेल वॉर्डची माहिती राज्याच्या नगरविकास खात्याच्या सचिवांकडे दिली जाणार आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून मॉडेल वॉर्डांची चाचपणी सुरू असून दक्षिण व उत्तर मतदारसंघांतील कोणत्या प्रभागांची यासाठी निवड करावी हा पेच निर्माण झाला आहे. यासाठी नगरसेवकांचे मतही विचारात घेतले जाणार आहे.
लवकरच नगरविकास खात्याच्या सचिवांसोबत मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्यातील महापालिकांकडून मॉडेल वॉर्डची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेकडूनही मॉडेल वॉर्ड निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार दक्षिण भागातून प्रभाग क्र. 29 तर उत्तर भागातून प्रभाग क्र. 32 ची निवड करावी का? याबाबत विचारमंथन सुरू आहे. पण नगरसेवकांवरच ही जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. नगरसेवक ज्या प्रभागांची नावे देतील ती नावे अंतिम होण्याची शक्यता आहे.
मॉडेल वॉर्डमध्ये निवडीसाठी अनेक नियम व अटी आहेत. सदर मॉडेल वॉर्ड इतर प्रभागांसाठी आदर्श ठरणारा हवा. त्या ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. प्रामुख्याने घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करणे, स्वच्छता, नागरी सेवा सुविधा असणे जरुरीचे आहे. कारण सदर मॉडेल वॉर्ड इतर प्रभागांसाठी एक उदाहरण असणे जरुरीचे आहे. घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करण्यासह सुका, ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण झाले पाहिजे. सुव्यस्थितीत रस्ते, पथदीप व इतर सुविधा असल्या पाहिजेत. चांगल्या प्रकारची ड्रेनेज व्यवस्था, उद्याने, हिरवळ, नागरिकांमध्ये जागरुकता, राहण्यासाठी स्वच्छ व सुंदर वातावरण असले पाहिजे. या सर्व सुविधा असणारे प्रभाग मॉडेल वॉर्ड म्हणून घोषित केले जाणार आहेत.
मॉडेल वॉर्ड निवडीसाठीची चाचपणी
मॉडेल वॉर्डमध्ये निवड झाल्यास नगरविकास खात्याकडून दोन कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून मॉडेल वॉर्ड निवड करण्यासाठी चाचपणी केली जात आहे.