विविध फ्लेवरमध्ये प्रसादाचे मोदक! मोदक 520 ते 860 रूपयांपर्यंत किलो
बालुशाई, खाजा, लाडू, म्हैसूरपाक, बुंदी, पेढे, गुलाबजामला मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
गणपती आगमनाला घराघरात खोबऱ्याचे मोदक करत असले तरी प्रसादासाठी दुधापासून बनवलेल्या मोदकांना अतिशय महत्व आहे. त्यामुळे बाजारात मलई, रेगुलर, ऑरेंज, मँगो, चॉकलेट, केशर, पिस्ता, प्लेन, स्टॉबेरी, बटरस्कॉच, कोकनट, खवा, काजू फ्लेवरमधील मोदक उपलब्ध आहेत. 520 ते 860 रूपयांपर्यंत किलो असा मोदकांचा दर आहे. मोदक खरेदीसाठी गर्दी होत आहे.
गणेशोत्सवात आरतीच्या प्रसादाला मोदकाला अतिशय महत्व असते. दहा दिवस गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद म्हणून खव्याच्या मोदकाचे वाटप केले जाते. त्यामुळे यंदा विविध फ्लेवरमधील मोदक बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट आणि बटरस्कॉच मोदकांना जास्त मागणी आहे. रंगीबेरंगी मोदकाचे प्रकार लक्ष वेधून घेत आहेत. विविध फ्लेवर किंवा एकाच फ्लेवरच्या मोदकांना मोठया प्रमाणात मागणी आहे. अनेक भाविकांनी जवळपास 1 किलोपासून ते 10 किलोपर्यंत मोदकाची ऑर्डर दिली आहे.
गौरी-गणपतीमध्ये सासरी असलेल्या मुलींना शिदोरी दिले जाते. त्यामुळे बाजारात बालुशाई, खाजा, म्हैसूरपाक, लाडू, गोड बुंदी बाजारात उपलब्ध असून, 240 ते 340 रूपयांना किलो असा त्याचा दर आहे. सासुरवासिनींना शिदोरी देण्याची लगबग सुरू असल्याने या पदार्थांना मागणी वाढली आहे.