Mock Drill : रेल्वेच्या डब्याला आग अन् यंत्रणांची धावधाव, रत्नागिरीत मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक
आपत्कालीन प्रसंगाची रंगीत तालीम असल्याचे कळताच साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला
रत्नागिरी : रत्नागिरी येथील रेल्वे स्थानक चाकरमान्यांच्या वर्दळीने गजबजलेले असताना अचानक रेल्वे गाडीच्या डब्याला भीषण आग लागल्याच्या बातमीने पोलिसांची उडालेली धावपळ, तातडीने दाखल झालेली रुग्णवाहिका, अग्निशमन दल, रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग, शीघ्र कृती दल व आपत्ती व्यवस्थापन अशा साऱ्याच यंत्रणा तात्काळ दाखल झाल्या.
त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवासी चाकरमान्यासह उपस्थित सर्वच जण संभ्रमात पडले. मात्र घडला प्रकार ही एक आपत्कालीन प्रसंगाची रंगीत तालीम असल्याचे समोर येताच साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. संपूर्ण देशभर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना रत्नागिरीत विविध ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी रंगीत तालीम (मॉक ड्रील) घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार सायंकाळी 4 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे हे मॉक ड्रील घेण्यात आले. यावेळी रत्नागिरी रेल्वे स्टेशन यार्ड येथे एका रेल्वे गाडीच्या डब्याला आग लागल्याचे दाखविण्यात आले होते. बरोबर 4 वाजता रेल्वेचा भोंगा (सायरन ) जोराने वाजविण्यात आला. आगीची खबर रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली.
त्यानुसार ग्रामीण पोलिसांचे पथक, अग्निशन दल, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेच्या डब्याला लागलेली आग तातडीने विझविण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्यात आली तसेच आतील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
रत्नागिरी शहर पोलीस घटनेबाबत अनभिज्ञरेल्वे स्थानक येथे घेण्यात आलेल्या रंगीत तालिममध्ये काही उणिवादेखील दिसून आल्य़ा रेल्वे स्थानक येथे गाडीच्या डब्याला आग लागल्याच्या घटनेची माहिती रत्नागिरी पोलिसांना देण्यात आली होती.
त्यानुसार एक पोलीस अधिकारी व कॉन्स्टेबल असलेले रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र रेल्वे डब्याला आग नेमकी कोणत्या ठिकाणी लागली आहे याचा थांगपत्ता या पथकाला नव्हता सुमारे अर्धा तास हे पथक आगीचे ठिकाणच शोधत होते. अखेर माहिती मिळाल्यानंतर हे पथक घटनास्थळासाठी रवाना झाले. मात्र त्यापूर्वी सर्व रंगीत तालिम आटोपली होती.