मोबिक्वीक उभारणार 700 कोटी रुपये
सेबीकडे केला अर्ज दाखल: डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिजिटल पेमेंट क्षेत्रात कार्यरत फर्म मोबिक्वीक यांनी अलीकडेच दुसऱ्यांदा नव्याने आयपीओकरीता सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. सदरच्या नव्या अर्जाद्वारे मोबिक्वीक आयपीओतून आगामी काळात 700 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचे म्हटले जात आहे.
2021 मध्ये केला होता अर्ज
आयपीओ सादरीकरणाआधी कंपनी 140 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. मोबिक्वीकने याआधी 2021 मध्ये आयपीओ सादरीकरणासंदर्भात आपला अर्ज बाजारातील नियामक सेबीकडे दाखल केला होता. पण त्यावेळी बाजारातील स्थिती नाजूक राहिल्याने कंपनीने आयपीओ सादरीकरणाचा निर्णय लांबणीवर टाकणे उचित समजले. त्यावेळी मात्र कंपनीने आयपीओतून 1900 कोटी रुपये उभारण्याची योजना बनवली होती.
उभारणीची रक्कम घटवली
आता पुन्हा नव्याने आयपीओची आखणी कंपनीने केली आहे. त्यानुसार नव्याने कंपनीने पुन्हा अलीकडेच सेबीकडे अर्ज सादर करताना आयपीओतून उभारायची रक्कम निम्मी केली आहे. याखेपेला कंपनी आयपीओतून 700 कोटी रुपये उभारणार आहे. गुरुग्राम येथील या मुळच्या कंपनीला या आयपीओतील उभारलेली रक्कम व्यवसाय विस्तारासाठी वापरायची आहे.