For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा कारागृहात आढळला सीमकार्डसह मोबाईल

06:58 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा कारागृहात आढळला सीमकार्डसह मोबाईल
Advertisement

कैद्यांच्या दोन गटांतील हाणामारीनंतर तपासणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर कारागृह अधिकाऱ्यांनी बराकीची तपासणी केली असता शौचालयातील कमोडमध्ये सीमकार्ड व अँड्रॉईड मोबाईल आढळून आला आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी यासंबंधी पाच कैद्यांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

Advertisement

कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर यांनी शनिवारी नागेंद्र के., राहणार शिवमोगा, जमीर ऊर्फ बच्चा ऊर्फ बच्चन, राहणार टिपूनगर, शिवमोगा, सय्यद तला नुमान, राहणार बिलालाबाद, जि. गुलबर्गा, अब्दुलखादर जिलानी, राहणार शिवमोगा, शंकराप्पा कोरवर ऊर्फ बजंत्री, राहणार कुंदगोळ या पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

31 जुलै रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास कैद्यांच्या दोन गटांत किरकोळ मारामारीची घटना घडली. हाणामारीत ते किरकोळ जखमीही झाले आहेत. भांडण व हाणामारीनंतर कारागृह अधिकाऱ्यांनी डेटिन्यू विभागात अचानक तपासणी केली असता शिवमोगा येथील शिक्षा झालेला कैदी नागेंद्र के. हा रहात असलेल्या सेलमधील शौचालयाच्या कमोडमध्ये सीमकार्ड व अँड्रॉईड मोबाईल आढळून आला आहे.

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात अमलीपदार्थ व मोबाईल पोहोचू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही वेगवेगळ्या बराकीत राहणाऱ्या कैद्यांकडे वेळोवेळी केलेल्या तपासणीत मोबाईल आढळण्याचे प्रकार सुरूच आहेत. बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारागृहाला भेट देऊन पाहणी केली आहे.

शौचालयातील कमोडमध्ये सीमकार्ड व मोबाईल

पाच कैद्यांविरुद्ध पोलीस स्थानकात फिर्याद

Advertisement
Tags :

.