मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
एकाला अटक, इतरांचा शोध सुरू
प्रतिनिधी/ पणजी
आगशी पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एका संशयिताला अटक केली. त्याच्याकडून दीड लाख ऊपये किंमतीचे दहा मोबाईल जप्त केले आहेत. आणखी काही संशयितांच्या शोधात पोलीस आहेत. चोरलेले मोबाईल 2 ते 10 हजारपर्यंत कामगारांना विकलेले असल्याचे उघड झाले आहे. राज्यातील विविध पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात 16 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. संशयिताच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव माविन फर्नांडिस (वय 19, मिंगफॉलवाडा-चिंचोणे) असे आहे. हा संशयित पर्यटक गाईड म्हणून काम करतो. बांबोळी येथील ऊग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरताना संशयिताला आगशी पोलिसांनी अटक केली आहे. गोमेकॉतील ऊग्णांसोबत असलेले नातेवाईक रात्रीच्यावेळेस वॉर्डाच्या आवारात झोपलेले असतात. पहाटेच्या वेळेस ते साखर झोपेत असताना ही संधी साधून मोबाईल चोरटे त्याचा फायदा घेतात आणि हे कृत्य करतात असे आढळून आले आहे. अटक केलेला संशयित टोळीतील मुख्य असून राज्यातील इतर पोलीस देखील चोरीच्या प्रकरणात त्याचा शोध घेत आहेत. आगशी पोलीस स्थानकात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली असता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिली असता संशयिताचा सुगावा लागला आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणारे व्यक्ती रात्रीच्यावेळी गोमेकॉत फिरणारे हे कोण त्याचा तपास करणे सुऊ केले आणि पोलीस संशयितापर्यंत पोहचले.
आगशी पोलिसांनी संशयिताची कसून उलट तपासणी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. 2007 पासून तो चोरीप्रकरणात असून राज्यातील विविध पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हे नोंद झालेले आहेत. आपल्या साथीदारासह गोमेकॉमधून बरेच मोबाईल फोन त्याने चोरले आहेत आणि कळंगुट येथील विविध मजुरांना 2 हजार ते 10 हजार ऊपयांना विकले आहेत, अशी माहिती चौकशी दरम्यान उघड झाली आहे.
संशयिताला अमलीपदार्थांचे व्यसन असल्याने अमलीपदार्थ विकत घेण्यासाठी तो मोबाईल चोरी करीत होता, असे जबानीत आढळून आले आहे. गोमेकॉतून आतापर्यंत चोरी झालेले मोबाईल फोन टेहळणीसाठी ठेवण्यात आले होते ते मोबाईल पश्चिम बंगाल आणि आसाम टॉवर क्षेत्रामध्ये असल्याचे दिसून येत होते. त्यानुसार कारवाई कऊन संशयिताला अटक केली आहे.
पणजी उपविभागीय अधिकारी सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली आगशी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, शुभम कोरगावकर, कॉन्स्टेबल राघोबा पार्सेकर, राजू अत्तार, संकेत मांद्रेकर आणि संजय वरक यांनी उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल यांच्या संपूर्ण देखरेखीखाली ही कारवाई केली. पुढील तपास सुऊ आहे.