हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल सापडण्याचे सत्र सुरूच
शनिवारी पुन्हा सापडले तीन मोबाईल : कैद्यांकडून वापर सुरूच
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. शनिवारी सकाळी कारागृहातील वेगवेगळ्या बराकीत तपासणी करताना तीन की-पॅड मोबाईल व एक चार्जर सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. एकीकडे पोलिसांनी मोबाईलचा मूळ शोधण्यासाठी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. तर दुसरीकडे मोबाईल सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक हुसानीपीर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी आदी अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
24 एप्रिल रोजी दुपारी सर्कल नं. 2 मधील दुसऱ्या क्रमांकाची बराकीत शौचालयात मोबाईल आढळला होता. शनिवारीही शौचालयातच मोबाईल आढळले आहेत. सर्कल नं. 2 मधील नवव्या क्रमांकाच्या बराकीत असलेल्या शौचालयाच्या खिडकीत दोन की-पॅड मोबाईल आढळून आले आहेत. तर याच बराकीतील टीव्हीजवळ आणखी एक की-पॅड मोबाईल ठेवण्यात आला होता. त्याबरोबर चार्जिंग केबलही आढळून आला आहे. कारागृहात आक्षेपार्ह वस्तू व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना बंदी असूनही कैद्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाईल वापरत असल्याचे सामोरे आले आहे.