2025 पर्यंत मोबाईल फोनची निर्यात वाढणार
40 टक्के वाढीवर भर : 1.8 लाख कोटींच्या फोन्सच्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात तयार होणाऱ्या मोबाईल फोन्सची निर्यात आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 40 टक्के इतकी वाढविणार असल्याचा अंदाज इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन यांनी वर्तविला आहे.
आर्थिक वर्ष 2025 पर्यंत भारतातून होणाऱ्या फोन्सची निर्यात 1.8 लाख कोटी रुपयांची होण्याची शक्यता आहे. निर्यातीमध्ये एकंदर आर्थिक वर्षात 40 टक्क्यांची वाढ पहायला मिळणार आहे, असे सांगितले जात आहे.
पीएलआयचा लाभ
पीएलआय योजनेच्या अंमलबजावणीनंतर भारतामध्ये मोबाईल निर्मिती कार्याला मोठ्या प्रमाणात वेग आलेला दिसून आला. अॅपल या दिग्गज कंपनीसह त्यांच्या कंत्राट कंपन्या फॉक्सकॉन, डिक्सन टेक्नॉलॉजीस आणि इतरांनी मोबाईल निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर दिला असून भारताने मोबाईल निर्यातीतसुद्धा मोठा पल्ला गाठला आहे. भारतात तयार झालेले मोबाईल फोन्स अमेरिकेमध्ये पाठविले जात आहेत.
1.8 लाख कोटींचा टप्पा ओलांडणार
आर्थिक वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत 1 लाख 50 हजार कोटींचे मोबाईल निर्यात करण्यात आलेत. हे पाहता आर्थिक वर्षाअखेर 1.8 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करणे अशक्य नसल्याचे संस्थेने म्हटले आहे.
उत्पादन 4.22 कोटींवर
पीएलआय योजनेची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर भारतातील मोबाईल उत्पादन दुप्पट झाले आहे, ही भारतासाठी आनंदाची बाब म्हणायला हवी. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2.2 लाख कोटी असणारे उत्पादन 4.22 लाख कोटींवर पोहोचले आहे.