Kolhapur : पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर आता कायमस्वरुपी राहणार
पोलिस प्रशासनाचा मोठा निर्णय
कोल्हापूर : पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल नंबर बदलतात. मात्र आता पोलीस अधीक्षकांसह सर्वच अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर आता कायमस्वरुपी राहणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी केलेले ८० मोबाईल व सिमकार्ड शनिवारी गुन्हेगारी आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.
पोलिसांचे दैनंदिन कामकाज गतिमान आणि विनाव्यत्यय होण्यासाठी पोलीस अधीक्षकांपासून ते सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनामोबाईल देण्यात आले. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ऑक्टोबर २०२५ मध्ये या उपक्रमासाठी १७ लाख २९ हजार २९६ रुपयांचा निधी मंजूर झाला. याची परवानगी पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही मंजूरी घेण्यात आली.
महापालिकेप्रमाणेच पोलिस प्रशासनामध्येही अधिकाऱ्यांना मोबाईल क्रमांक देण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षकांपासून पोलिस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, निर्भया पथकासाठी एकाच सिरीजमधील नंबर घेण्यात आले आहेत. जेणेकरून हे क्रमांक नागरिकांकडे कायमचे सेव्ह राहतील.
नागरीकांसाठी उपयुक्त ठरणार
सर्वसामान्य नागरीकांना काही गोपनीय बाबी थेट पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतात. पण, पोलीस ठाण्याकडून अनेकदा अधिकाऱ्यांचा नंबर दिला जात नाही. तर काही वेळेस अधिकारी पोलिस ठाणे बदलून गेल्यानंतर अडचणी येतात. अशावेळी जनतेच्या तक्रारींचे तातडीने निवारण होण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.