पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन
गुन्हेगारी प्रकरणांचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यास होणार मदत
त. भा.प्रतिनिधी
बेळगाव : गुन्हेगारी प्रकरणांचा तपास अधिक शास्त्रीय आणि प्रभावीपणे करण्यासाठी पोलीस खात्याने बेंगळूर येथील राज्य न्यायवैधक विज्ञान प्रयोग शाळेच्या सहकार्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सेवा सुरू केली आहे. त्याच धर्तीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयानेही नुकतेच एक मोबाईल फॉरेन्सिक वाहन उपलब्ध करून दिले आहे.
सदर वाहनाच्या माध्यमातून गुन्हा घडलेल्या ठिकाणी वैज्ञानिक पुरावे शोधणे, दाखल करून घेणे, पुरावे गोळा करण्यासह सुरक्षितपणे जतन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक उपकरणांनी सदर वाहन सुसज्ज आहे. या व्हॅनमध्ये एकूण 16 विविध फॉरेन्सिक किट्स आहेत. त्यामध्ये क्राईम सीन प्रोटेक्शन कीट, रक्त आणि वीर्य चाचणी व संकलन कीट, डीएनए आणि लैंगिक अत्याचाराचे पुरावे संकलन कीट, शस्त्रे आणि स्फोटके तपासणी कीट, अमलीपदार्थ तपासणी कीट, डिजिटल पुरावे संकलन कीट, आग, अपघात तपासणी कीट, एसडब्ल्यूआयआर मायक्रोस्कोप, बोटांचे ठसे आणि पावलांचे ठसे संकलन कीट, उच्च तीव्रतेचा प्रकाश स्त्रोत यासारखी अनेक उपकरणे आहेत.
या व्यतिरिक्त व्हॅनमध्ये फ्रीज, जीपीएस असलेला कॅमेरा, जनरेटर, युपीएस, फूड लाईट, एलईडी स्ट्रीप, घटनास्थळाची छायाचित्रे घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरा, पुरावे सुरक्षितपणे पॅक करण्यासाठी आवश्यक साहित्य आहे. या वाहनामुळे गुन्हा घडलेल्या ठिकाणी तपास अधिकारी घटनेनंतर तात्काळ त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची शास्त्रीय तपासणी करू शकतात. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार पुरावे गोळा करता येतात. न्यायालयात योग्य शास्त्रीय पुरावे सादर करून गुन्हेगारांना दोषी ठरविण्यासाठी सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.
पोलीस खात्याच्या ताफ्यात तीन अतिरिक्त बोलेरोंचा समावेश
सरकारने पोलीस आयुक्तालयाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्याबरोबरच आणखी तीन नवीन बोलेरो वाहने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे पोलीस खात्याच्या ताफ्यात तीन अतिरिक्त बोलेरोंचा समावेश झाला आहे. ज्या पोलीस स्थानकाला वाहनांची आवश्यकता आहे, त्या पोलीस स्थानकांना वाहने दिली जाणार आहेत.