Satara Crime | मोबाईल चॅटिंगचा राग ठरला जीवघेणा; फलटणमधील १८ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघे अटकेत
सोमनाथ जाधव खून प्रकरणात पोलिसांची कारवाई
फलटण -मिऱ्याचीवाडी (दालवडी) ता. फलटण येथील सोमनाथ संदीपजाधव खून प्रकरणातील दोन संशयित आरोपींना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दि. १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेतील एक संशयित आरोपी अद्याप फरार आहे.
तेजस उर्फ चिक्या शिवाजी लोखंडे (वय २४), व प्रद्युम्न उर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे (वय २२ दोघेही रा. ढवळ, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मुलीशी मोबाईलवर मृत सोमनाथ जाधव हा
चॅट करीत असल्याच्या कारणावरून संबंधित मुलीच्या नातेवाईकांना राग होता. शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अठरा वर्षीय सोमनाथ जाधव याला ढबळपाटी येथे नेऊन आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, चिक्यालोखंडे व पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ ता. फलटण) यांनी अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत उपचारदरम्यान सोमनाथ याचा मृत्यू झाल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी फरारी झालेल्या आरोपींपैकी आदित्य विजय शिंदे (वय २३, रा. ढवळ, ता. फलटण) यास दि. ११ एप्रिल रोजी अटक केली असून न्यायालयाने त्याला दि. १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतील अन्य आरोपी तेजस उर्फ चिक्या शिवाजी लोखंडे व प्रद्युम्न उर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे यांना पोलीसांनी १३ एप्रिल रोजी अटक केली आहे. १४ एप्रिल रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घटनेतील अन्य संशयित आरोपी ओम लोखंडे हा फरारी आहे.