वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोबाईल हजेरी अनिवार्य
आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांची माहिती : राज्यभरात 1 जुलैपासून होणार अंमलबजावणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून मोबाईल हजेरी अनिवार्य केली जात आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून अखेर सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. सरकारी ऊग्णालयांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक नवीन हजेरी प्रणाली लागू केली जात आहे. याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सध्या वापरात असलेल्या उपस्थिती व्यवस्थापन प्रणालीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर अवलंबून आहे. हार्डवेअर उपकरणांना वारंवार दुऊस्ती आणि वेळोवेळी बदलण्याची आवश्यकता असते. हा खर्च कमी करण्याचा एक महत्त्वाचा उपाय होता. बायोमेट्रिक उपकरणांच्या स्थिर स्वरुपामुळे उपस्थिती ओळखणे विशिष्ट ठिकाणी मर्यादित होते. या क्षेत्राशी संबंधित दुर्गम भागात काम करणाऱ्यांसाठी हे उपयुक्त नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन सुविधेत मोबाईल सॉफ्टवेअरद्वारे हजेरी घेण्याची प्रणाली लागू केली जात आहे. राज्यातील 12,000 आरोग्य संस्थांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या चौकटीत सदर मोबाईल हजेरी प्रणाली असून यापुढे सरकार डॉक्टरांची वेळेवर हजेरी सुनिश्चित करेल, असेही मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.