Kolhapur MNS: स्मशानभूमीत भानामतीसाठी वापरलेल्या लिंबूंचा सरबत पिला, मनसेकडून अघोरी प्रकारांचा निषेध
स्मशानभूमीत अज्ञात भोंदूबाबांकडून अघोरी प्रकार करण्याचे प्रमाण वाढले
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील स्मशानभूमीत मागील काही दिवसांपासून अघोरी प्रकार पहायला मिळत आहेत. काही दिवसांपासून येथील हुपरी रस्त्यावर असणाऱ्या शासकीय स्मशानभूमीत अज्ञात भोंदूबाबांकडून अघोरी प्रकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भितीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, आज सकाळी एका मयत व्यक्तीच्या मातीच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर संतोष कांबळे, शशिकांत खांडेकर, दगडू कांबळे, बाळकृष्ण शिंगे, किरण कमांडर यांना शवदाहीन्यांवरच काही व्यक्तींचे फोटो त्यावर टाचणी मारलेली, हळदी-कुंकवाने माखलेले नारळ, लिंबू, काळेमनी, तंबाखूपुडी, चिलीम,गांजा हे सर्व काळ्याकपड्यांमध्ये बांधून ठेवल्याचे दिसले. येथे काहीतरी आघोरी प्रकार घडला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले असून या अघोरी, करणी, भूतबाधेच्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करण्यात आला. ग्रामस्थांतील भीती दूर करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून चक्क या आघोरी प्रकारात वापरण्यात आलेल्या लिंबूचे सरबत पिऊन भोंदूगिरीचा निषेध करण्यात आला.
यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवि आडके, विभाग अध्यक्ष अन्वर जमादार, तालुका संघटक रवि जाधव, सुशांत जाधव, मंगेश म्हेत्तर, विठ्ठल गावडे, संतोष चव्हाण, वैभव भोजकर, जिवेंद्र जाधव, आकाश डोंगळे कार्यकर्ते उपस्थित होते.