Kolhapur News : महिला अधिकाऱ्यावर शिवीगाळ प्रकरणी मनसे शहराध्यक्षांसह तिघांना अटक
मनसे शहराध्यक्षांसह तिघांना अटक
कोल्हापूर : माहिती अधिकारातील माहिती तत्काळ देण्यासाठी महिला अधिकाऱ्यावर दबाव टाकत महिला अधिकाऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळकेल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष प्रसाद आनंदराव पाटील (वय ४८ रा. शिवाजी पेठ कोल्हापूर), अभिजीत प्रकाश पाटील (वय ३२ रा. उचगाव ता. करवीर), दत्ता उर्फ अरविंद कृष्णात कांबळे (वय ३४ वर्ष रा. खुपिरे ता. करवीर) या तिघांना अटक करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात प्रसाद पाटील यानेमाहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. दि. ३० ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत संबंधित माहिती देण्यासाठी कार्यालयातील महिला अधिकाऱ्यांशी वारंवार वाद घातला होता. यावेळी त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलून फोनवरून अवमानकारक बोलणे सुरूच होते. महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करत त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले होते.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगासह शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद पाटील, अभिजीत पाटील, दत्ता उर्फ अरविंद कांबळे या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.