आमदार गाडगीळांच्या घरासमोर आंदोलन करु
सांगली :
शक्तीपीठ महामार्गच रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आ. सुधीर गाडगीळ यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. गुरूवारी कष्टकऱ्यांच्या दौलतमध्ये समितीची तातडीची बैठक झाली.
अनेक दिवसांपासून जिह्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. पुर्वीच्याच रेखांकानुसार महामार्ग करण्याची तयारी शासन स्तरावर सुरू झाली आहे. आंदोलन करुनही सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. रेखांकन बदलुन महामार्ग करणार अशा वल्गना हवेत विरल्या. ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत.
काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक यांनी पर्यावरण खात्याकडे शक्तीपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला. आणि मंगळवारी सर्व जिल्हाधिकारी यांची बैठक एमएसआरडीसी घेवुन शक्तीपीठ महामार्गाचे कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिह्यातील लोकप्रतिनिधी विरोध करताना दिसत आहेत. सांगली जिह्यातील लोकप्रतिनिधी बोलत नाहीत. म्हणून सत्ताधारी आमदारांच्या दारात आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यासंबंधी निवेदन शुक्रवारी आ. गाडगीळ यांना देणार आहे.
या बैठकीस उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, सा†नल पवार, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हाऊगडे, सुधाकर पाटील इत्यादीसह शेतकरी उपस्थित होते.