Karantaka : आमदारांना मिळणार 25 कोटीचे विशेष अनुदान
काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ बेंगळूर
गॅरंटी योजना प्रभावीपणे जारी करण्यासाठी यंदा राज्य सरकारने मतदारसंघांतील विकासकामे राबविण्यासाठी अनुदान न दिल्याने सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्येही नाराजी आहे. ही नाराजी उफाळून येऊ नये याकरिता मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मतदारसंघांतील विकासकामांसाठी प्रत्येकी 25 कोटी रुपये विशेष अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगावमध्ये सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. दरम्यान बुधवारी रात्री येथील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक घेतली. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी मतदारसंघांसाठी अनुदान देण्याचा मुद्दा मांडला. सरकार सत्तेवर येऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र, मतदारसंघात विकासकामे राबविण्यासाठी अनुदान नसल्याने जनतेची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे, असा मुद्दा काहींनी व्यक्त केला. अखेर सिद्धरामय्या यांनी तुम्हाला सध्या प्रत्येकी 25 कोटींचे विशेष अनुदान देण्यात येईल, त्यातून कामे सुरू करा, असे आश्वासन दिले.
तयारीनिशी सभागृहात या!
अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. याकरिता मंत्री आणि पक्षाच्या आमदारांनी तयारीनिशी सभागृहातील कामकाजात सहभागी व्हावे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
तालुका, जिल्हा पंचायत निवडणुका केव्हा?
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. याविषयी देखील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीआधी ता. पं. - जि. पं. साठी निवडणुका घ्याव्यात की नंतर? याविषयी दीर्घ चर्चा झाली. अखेर यासंबंधीचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांवर सोपविण्यात आले. शिवाय मुख्यमंत्री याबाबत घेतील त्या निर्णयावर कटिबध्द राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.