आमदारांनी फुकटचे श्रेय घेवू नये : दीपक चव्हाण
फलटण :
फलटण शहर व तालुक्यातील अनेक विकासाची कामे आमच्या सत्ताकाळात मंजुर आहेत. ती सर्व कामे आगामी सहा महिने चालतील. सध्या या मंजुर विकासकामांचे नारळ फोडुन विद्यमान आमदार व त्यांचे सहकारी लोकांची दिशाभूल करीत असुन फुकटच्या कामांचे श्रेय विरोधकांनी घेवू नये, अशी टीका माजी आमदार दिपक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या २/३ महिन्यात विद्यमान आमदार सचिन कांबळे पाटील व त्यांचे सहकारी विविध विकासकामांचे नारळ फोडुन कामे सुरू करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी दीपक चव्हाण बोलत होते.
पत्र दिले की लगेच कामे सुरु होत नसतात. विद्यमान आमदार व त्यांचे सहकारी ज्या कामांचे नारळ फोडतात. ती कामे आमच्या काळात आम्हीच मंजुर करून घेतली आहेत. त्यामुळे या कामांचे श्रेय घेवून जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे, असा खुलासा शहर व तालुक्यात सध्या सुरू असणाऱ्या कामाबाबत चव्हाण यांनी केला.
माजी आमदार चव्हाण पुढे म्हणाले, काल परवा एसटी बसेसच्या लोकार्पण कार्यकमाला आमदार कांबळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. फक्त फलटणलाच बसेस मिळाल्या असे नाही तर शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे राज्यातील सर्वच ठिकाणी एसटी बसेस मिळाल्या आहेत. फलटणला एसटी बसेस मिळण्यासाठी रामराजे यांनी २०२१-२२ सालात शासनाकडे मागणी केली होती. त्यावेळी शासनाने निर्णय न घेता आता धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे नवीन एसटी बसेस मिळाल्या आहेत. नवीन बसेस येणे हे नवीन नाही. मागील काळातच आम्ही मागणी केल्याचा व सततच्या पाठपुराव्याचा हा परिपाक आहे. फलटण एसटी स्टॅण्ड बारामतीच्या धर्तीवर बांधू असे वक्तव्य आ. सचिन कांबळे करीत आहेत, परंतु मागील काळातच आम्ही या कामासाठी ४-५ कोटी मंजुर केल्यामुळे फलटण एसटी बस स्टॅण्डचे काम बऱ्यापैकी झाले असल्याचे सांगत विद्यमान आमदारांना फलटणचे स्टॅण्ड बारामतीसारखे करायचे असेल तर खुशाल त्यांनी करावे. लोकांनी त्यांना काम करण्याची संधी दिली आहे ते त्यांनी करावे असा सल्लाही चव्हाण यांनी यावेळी दिला.
फलटण शहरात नगरोत्थान व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अनेक कामे मंजूर असुन या कामांचे नारळ फोडुन आज ती कामे सुरू केली जात आहेत. शहरातील अनेक कामे आम्ही मंजुर केलेल्या फंडातील आहेत. अधिकारीवर्गाने पक्षपाती असु नये. कामे सुरू करताना आम्हालाही सांगावे. अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे. यापुढे असेच होणार असेल तर अधिकाऱ्यांना वेगळ्या भाषेत सांगावे लागेल. आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कसे वागायचे हे त्यांनी ठरवावे, अशी तंबीही चव्हाण यांनी दिली आहे.