For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार हेब्बार, सोमशेखर यांची भाजपमधून हकालपट्टी

06:17 AM May 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमदार हेब्बार  सोमशेखर यांची भाजपमधून हकालपट्टी
Advertisement

पक्षविरोधी कारवाईचा आरोप : केंद्रीय शिस्तपालन समितीच्या सदस्यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार आणि बेंगळूरच्या यशवंतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एस. टी. सोमशेखर यांची 6 वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपमध्येच राहून हे दोन्ही आमदार काँग्रेस पक्षासोबत दिसून आले होते. त्यामुळे या दोघांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, असे केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Advertisement

वारंवार शिस्तभंगाचे उल्लंघन केल्याने मार्च महिन्यात या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीला योग्य उत्तर न दिल्यामुळे दोघांची भाजपमधून हक्कालपट्टी करण्यात आली. हे दोन्ही नेते काँग्रेस पक्षाच्या बैठकांमध्ये उघडपणे सहभागी होत होते. शिवाय ते उघडपणे पक्ष नेतृत्वाविऊद्ध विधाने करत होते. हे मुद्दे गांभीर्याने घेतलेल्या केंद्रीय शिस्तपालन समितीने दोघांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे

हकालपट्टीचा आदेश जारी होताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र  मंगळवारी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आमदार शिवराम हेब्बार आणि एस. टी. सोमशेखर यांच्या पक्षविरोधी कारवायांचीही त्यांना माहिती आहे. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना यात लक्ष घालण्याची गरज नाही. या दोन्ही आमदारांच्या हकालपट्टीचे मी स्वागत करतो. पक्ष सत्तेत आल्यावर शिवराम हेब्बार आणि सोमशेखर यांना अधिकार देण्यात आले होते. तथापि, ते पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होत होते, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी पक्षविरोधी कारवाया आणि राज्य भाजप नेत्यांविऊद्ध सार्वजनिक विधाने करणाऱ्या आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता या दोन आमदारांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकत भाजप हायकमांडने पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना एक कडक संदेश दिला आहे. यापूर्वी सोमशेखर आणि शिवराम हेब्बार यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, पोटनिवडणुकीत भाजपमधून विजयी होऊन दोघेही मंत्री झाले होते. नंतर त्यांनी 2023 ची सार्वत्रिक निवडणूक भाजपकडून लढवली आणि जिंकली होती. पण दोन्ही आमदारांनी पक्षापासून अंतर ठेवले होते.

राज्यातील भाजपमध्ये तीन गट कार्यरत : शिवराम हेब्बार

कारवार : राज्यातील भाजपमध्ये तीन गट कार्यरत आहेत. गटांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केलेले यल्लापूर, मुंदगोडचे आमदार आणि माजी मंत्री शिवराम हेब्बार यांनी वर्तविली आहे. यल्लापूर येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आपण समाधानी आहे. भाजपने आपली केलेली हकालपट्टीचे स्वागत करतो. भाजपमध्ये मूळ भाजपवाल्यांचा गट, भाजप बंडखोर आमदार गट, पक्षातून हकालपट्टी केलेल्यांचा गट असे तीन गट कार्यरत आहेत. आपणाला भाजपमध्ये ठेवून घेण्याची क्षमता त्या पक्षाकडे नाही, असे स्पष्ट करून हेब्बार म्हणाले, आपण भाजपच्या ऑपरेशनद्वारे भाजपमध्ये प्रवेश केला होता. ऑपरेशनद्वारेच भाजपने सत्ता हस्तगत केली होती. त्याची आठवण भाजपला हवी होती. पक्षात सुरू असलेल्या बंडखोरीवर औषध शोधून काढायचे सोडून हा पक्ष ऑपरेशन करीत आहे. असे केल्याने या पक्षात आणखी काही गट निर्माण होतील, असे भाकीत वर्तवून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद दिले आणि आमदार या नात्याने आपण मतदारांचा विकास घडवून आणणार आहे, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.