For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्यांच्या गटातील आमदार दिल्लीला जाण्याच्या तयारीत

06:33 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्यांच्या गटातील आमदार दिल्लीला जाण्याच्या तयारीत
Advertisement

सिद्धरामय्यांच्या गटातील आमदार दिल्लीला जाण्याच्या तयारीत

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

Advertisement

राज्यात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेवरून राजकीय हालचालींना ऊत आला आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे समर्थक आमदार नेतृत्वात बदल होईल, 15 मे पूर्वी काँग्रेस हायकमांड खूशखबर देईल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटातील मंत्र्यांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली आहे. आता सिद्धरामय्या यांच्या गटातील आमदार दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत.

मागील आठवड्यात डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू माजी खासदार डी. के. सुरेश यांनी दिल्ली दौरा करून वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. ते बेंगळूरला परतल्यानंतर लागलीच मंत्री सतीश जारकीहोळी आणि डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी दिल्ली गाठली. त्यांनी सोमवारी रात्री पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राज्यातील गोंधळ दूर करण्याची विनंती केली होती. मंगळवारी महादेवप्पा यांनी राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री बदलावरून सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच मंत्रिपदासाठी मेच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ आमदार पुन्हा दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत. हे आमदार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गटातील असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस गोटात अधिकाराच्या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींची माहिती काँग्रेस हायकमांडला मिळाली आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर राज्य काँग्रेसमधील अधिकार हस्तांतरण आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर हायकमांडकडून तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

 15 मेपूर्वी शिवकुमार मुख्यमंत्री बनण्याची चिन्हे : इक्बाल हुसेन

यापूर्वी डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री बनण्यासंबंधी दोन तारखा सांगितलेल्या आमदार इक्बाल हुसेन यांनी आता 15 मे ची तारीख दिली आहे. 15 मेपूर्वी डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री बनण्याची चिन्हे आहेत. माझ्याकडून ही अंतिम तारीख आहे. शिवकुमार हे मुख्यमंत्री बनावेत ही केवळ माझी एकट्याची इच्छा नाही. राज्यातील बहुतांश आमदारांची इच्छा आहे. त्यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वात राज्याचा विकास आणखी वेगाने व्हावा, अशी आमची महत्वाकांक्षा आहे, असेही आमदार हुसेन यांनी म्हटले आहे.

हायकमांडने ठाम निर्णय घ्यावा : राजण्णा

राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांकडून उघडपणे वक्तव्ये होत आहेत. याच दरम्यान, माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी, सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी आणि पदत्याग दोन्हीसाठी तयार आहेत, असे वक्तव्य केले आहे. राजण्णा यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. हायकमांडने गोंधळाला वाव देऊ नये. ठाम निर्णय घ्यावा. हायकमांडच्या निर्णयाशी सिद्धरामय्या कटिबद्ध राहतील. अधिकार हा शाश्वत नसतो. दलित मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर मी आजही ठाम आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.