आमदार यत्नाळ यांची हकालपट्टी
भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीची कारवाई : सदस्यत्वावरून सहा वर्षांसाठी हटविले : पक्षविरोधी कारवायांचा परिणाम
प्रतिनिधी/ बेंगळूर
पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मंगळवारी रात्री भाजपश्रेष्ठींनी राज्य भाजपच्या पाच नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या पाठोपाठ बुधवारी विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची भाजपमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर देखील सातत्याने पक्षविरोधी कृत्ये, राज्य भाजप नेतृत्त्वावर टीका केल्याने यत्नाळ यांची शिस्तपालन समितीने पक्षातून हकालपट्टी केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध उघडपणे वक्तव्ये करून पक्षाची कोंडी केल्याने वरिष्ठांनी आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांना दोन वेळा कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. 10 फेब्रवारी रोजी त्यांनी नोटिशीला उत्तर दिले होते. त्यावर विचारविमर्श करून पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने बुधवारी यत्नाळ यांना सहा वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे राज्य भाजपमधील गटबाजीच्या राजकारणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या कारवाईमुळे यत्नाळ यांच्या गटात वावरणाऱ्या नेत्यांना धक्का बसला आहे.
यत्नाळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विरोधात सातत्याने टीका केली होती. आपल्या समर्थकांची मोट बांधून स्वतंत्रपणे बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. तरी सुद्धा त्यांनी मौन न बाळगता आपल्या शैलीत राज्य भाजप नेतृत्त्वावर परखड टीका केली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना आमदार यत्नाळ यांनी उत्तम वर्तन आणि पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले होते.
कारवाईच्या आदेशात काय उल्लेख?
नोटिशीनंतरही उघडपणे वक्तव्ये करून पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन झाल्याने पक्षाने गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून सहा वर्षांसाठी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पक्षाच्या कोणत्याही पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आले आहे, असा उल्लेख पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी आदेशात केला आहे.
यत्नाळ समर्थकांकडून राजीनामे
आमदार यत्नाळ यांच्यावर कारवाई होताच विजापूर जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. विजापूर शहर भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष भीमू मुशाळ यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे विजापूर शहर भाजप मंडलचे अध्यक्ष हुगार यांना राजीनामापत्र पाठविले आहे.
दुष्ट लोकांसाठी ही समृद्धीची वेळ : यत्नाळ
पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी झाल्यानंतर आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सोशल मीडियावर खोचक टिप्पणी केली आहे. ही सत्यवंतांची वेळ नाही, तर दुष्ट लोकांसाठी समृद्धीची वेळ आहे. घराणेशाही राजकारणाला आक्षेप, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, पक्षातील सुधारणेविषयी वक्तव्य, एकाधिकारशाहीला विरोध केल्याने माझ्यावर कारवाई झाली आहे. काही स्वार्थी हितशत्रूंनी त्यांचा अजेंडा यशस्वीपणे पुढे नेण्याची काम केले आहे. कारवाई झाली तरी मी भ्रष्टाचार, कौटुंबीक राजकारण, उत्तर कर्नाटकाचा विकास आणि हिंदुत्त्वाचा लढा थांबविणार नाही, अशी प्रतिक्रियाही यत्नाळ यांनी दिली आहे.
पक्षात शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य!
आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई ही परिस्थितीचे दीर्घ अवलोकन केल्यानंतर वरिष्ठांनी उचलेले अपरिहार्य पाऊल आहे. राजकीय पक्ष, संघाचे संस्कार असलेल्या आणि समर्पण भावनेने कार्यकर्त्यांनी घाम गाळलेल्या भाजपमध्ये शिस्तीला सर्वोच्च प्राधान्य आहे.
- बी. वाय. विजयेंद्र, भाजप प्रदेशाध्यक्ष