आमदार वीरेंद्र पप्पी यांना पुन्हा 6 दिवसांची ईडी कोठडी
बेंगळूर : ऑनलाईन बेटींगशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या ईडी कोठडीत 6 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. वीरेंद्र पप्पी यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात सिक्कीममध्ये अटक केली होती. त्यांना न्यायालयाने 5 दिवसांसाठी ईडीच्या ताब्यात दिले होते. गुरुवारी ही मुदत संपल्याने त्यांच्या कोठडीत पुन्हा 6 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी सुनावणीवेळी न्यायालयाने ईडीच्या वकिलांना फटकारले. वीरेंद्र पप्पी यांना झोपेसाठी वेळ द्यावा, शुद्ध पिण्याचे पाणी, औषधे, विश्रांतीसह इतर सुविधा पुरवाव्यात अशी सूचना दिली. तसेच दररोज 30 मिनिटे वकिलांच्या भेटीसाठी मुभा द्यावी, असे निर्देशही दिले.
अटक करताना आरोपीविरुद्ध कोणते गुन्हे नोंदविले? 2011 चा खटला रद्द झाला आहे. 2016 चा सीबीआयचा खटलाही बंद झाला आहे. आरोपीच्या अटकेनंतर कोणत्या तरी खटल्यांचा उल्लेख केला आहे. कोणत्या प्रकरणाच्या आधारे ईसीआयआर दाखल केला आहात?, तुम्ही न्यायालयाची का दिशाभूल करत आहात?, अशा परखड शब्दात लोकप्रतिनिधी न्यायालयाचे न्यायमूर्ती गजानन भट यांनी ईडीच्या वकिलांना फटकारले. आपल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विश्रांतीसाठी वेळ दिला जात नाही. औषधाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. सततच्या चौकशीमुळे पुरेशी झोप होत नाही, अशी तक्रार आमदार वीरेंद्र यांनी वकिलांमार्फत न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे न्यायालयाने ईडीच्या वकिलांना फटकारले.