आमदार विनय कुलकर्णी पुन्हा सीबीआयच्या ताब्यात
चौकशीनंतर परप्पन अग्रहार कारागृहात रवानगी
प्रतिनिधी/ बेंगळूर
धारवाडमधील भाजप नेते योगीश गौडा हत्याप्रकरणी माजी मंत्री व आमदार विनय कुलकर्णी हे शुक्रवारी बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी न्यायालयासमोर हजर झाले. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
योगीश गौडा हत्या प्रकरणात आमदार विनय कुलकर्णी यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता. तसेच आठवडाभरात बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी न्यायालयात शरण येण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कुलकर्णी शुक्रवारी न्यायालयासमोर शरण आल्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना सीबीआयच्या ताब्यात दिले. चौकशीनंतर त्यांना परप्पन अग्रहार कारागृहात पाठविण्यात आले.
धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा यांची 15 जून 2016 रोजी हत्या झाली होती. त्यावेळी विनय कुलकर्णी हे मंत्री होती. या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्याने 5 नोव्हेंबर 2020 रोजी सीबीआयने त्यांना अटक केली होती. 9 महिन्यांनंतर त्यांना 13 ऑगस्ट 2021 रोजी जामीन मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेश करू नये, या अटीवर जामीन दिला होता. तसेच सीबीआयला तपास गतिमान करण्याची आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम जलद पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे सीबीआयला पुरावे गोळा करताना साक्षीदारांना विनय कुलकर्णी यांच्याकडून आमिष दाखविण्यात येत असल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तसेच विनय कुलकर्णी यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती केली होती. 6 जून रोजी सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने आमदार कुलकर्णी यांचा जामीन रद्द केला तसेच आठवडाभरात शरण येण्याची सूचना दिली होती. शुक्रवारी लोकप्रतिनिधी न्यायालयात हजर झाले असता न्यायालयाने त्यांना सीबीआयच्या ताब्यात दिले.